देखता है बेलापूर, जाता है बांद्रा; हार्बर रेल्वे भरकटली

सामना प्रतिनिधी, मुंबई

मध्य रेल्वेच्या मोटरमननी रेड सिग्नल ओलांडण्याच्या लागोपाठच्या घटना घडल्यानंतर हार्बरची बेलापूरला जाणारी लोकल वांद्रे येथे गेली. या विचित्र प्रकाराने सोमवारी रात्री खळबळ उडाली. प्रवाशांनी आरडाओरड केल्यानंतर ही लोकल किंग्ज सर्कल येथे रद्द करण्यात आली.

रात्री १०.०१ वाजताच्या बेलापूरला जाणाऱ्या लोकलला वडाळा येथे वांद्रय़ाचा सिग्नल मिळाल्याने ही लोकल वांद्रय़ाला गेली. त्यानंतर गाडीतील प्रवाशांनी गोंधळ घातल्याने गाडी थांबविण्यात आली. तोपर्यंत तीन ते चार डबे पुढे गेले होते, परंतु गाडी रिव्हर्स घेता येत नसल्याने अखेर ही लोकल वांद्रय़ास नेण्यात आली. त्यानंतर किंग्ज सर्कल येथे लोकल रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. यामुळे हार्बरची वाहतूक अर्धा तास विस्कळीत झाली. प्रवाशांना झालेल्या मनस्तापाबद्दल मध्य रेल्वेकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली.