तांत्रिक बिघाडामुळे ‘हार्बर ब्लॉक’

1

सामना प्रतिनिधी । मुंबई

सायंकाळी सहाच्या सुमारास हार्बर रेल्वे मार्गावरील रे रोड स्थानकाजवळ झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी चक्क हार्बर लाईनच ‘ब्लॉक’ झाली. त्यामुळे कार्यालयातून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. तांत्रिक बिघाडमुळे खंडित झालेला वीजपुरवठा पाऊण तासात पुर्ववत झाला खरा, पण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून वडाळ्यापर्यंत अप आणि डाऊन मार्गावर ठिकठिकाणी गाडय़ा थांबल्या. झालेले बंचिंग सुरळीत व्हायला बराच वेळ लागल्याने गाडय़ा गोगलगायच्या वेगाने सुरू होत्या. त्यामुळे सर्वच स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी झाली होती.

हार्बर रेल्वेची वाहतूक सायंकाळी सुरळीत सुरू असतानाच अचानक रे रोड आणि सॅण्डहर्टस स्थानकांच्या दरम्यान ओव्हरहेड वायरला वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफार्मरमध्ये आग लागल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. या बिघाडामुळे गर्दीच्या वेळीच सर्व वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

पंखे, लाईटसह उद्घोषणाही बंद
ओव्हरहेड वायरला होणारा वीजपुरवठाच खंडित झाल्याने लोकलमधील पंखे, लाईट पूर्णपणे बंद झाल्या होत्या. तसेच गाडीमध्ये होणारी उद्घोषणाही पूर्णपणे बंद होती. त्यामुळे वीजपुरवठा कधी सुरू होणार, गाडी पुढे कधी जाणार याबाबत कोणतीच माहिती मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.