प्रदूषण रोखण्यासाठी खूप काम करावे लागणार – चितळे

42

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

हिंदुस्थानची सांस्कृतिक परंपरा जपणे आवश्यक आहे. जगाच्या आपल्याकडून काही अपेक्षा आहेत. त्या भावना आपण जपणे आवश्यक आहे. विदेशी लोकांनाही आदर असलेल्या गंगेच्या जलशुद्धीकरणाचा प्रकल्प हाती घ्यावा लागतो यावरून आपण निर्मलतेच्या किती दूर आहोत हे दिसून येत असून वाराणशी आणि प्रयागसारख्या अनेक ठिकाणचे प्रदूषण रोखण्यासाठी खूप काम करावे लागेल, असे प्रतिपादन जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी केले.

अ‍ॅग्रो इकॉनॉमिक रिसर्च सेंटर आणि वेदांत गृहकुल निवासी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संवाद माधवरावांशी’ या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. यशोमंगल कार्यालयात पार पडलेल्या या आगळ्यावेगळ्या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते. व्यासपीठावर भारतीय किसन संघाचे अ. भा. संघटनमंत्री दिनेश कुलकर्णी, राज्य माहिती आयुक्त दिलीप धारूरकर, प्रकट मुलाखत घेणारे अरुण करमरकर, विजया चितळे आदिंची उपस्थिती होती.
मुलाखतीत अरुण करमरकर यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची चितळे यांनी दिलखुलास उत्तरे दिली. त्यांनी आपल्या बालपणापासून सुरुवात केली ते इंदोर प्रयाणाचा आढावा घेताना ते म्हणाले की, व्हिएतनामच्या विद्यापीठात हिंदुस्थानी ऋषी ग्रंथ लिहीत बसले असल्याचे शिल्प आपल्या संस्कृतीची जगभर आवड असल्याची साक्ष देणारे आहे. दक्षिण आशियातील नेतृत्व देशाकडे येऊ पाहते आहे असे नेतृत्व आपण देऊ शकतो का?, कृषी क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते तयार करावे लागणार आहेत. अशी विविध प्रकारची आव्हाने पेलण्याचे काम देशाला करावी लागणार आहेत.

विकासाची वाटचाल आणि प्राचीन संस्कृतीची नाळ जोडणे शक्य आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात चितळे म्हणाले, समाजजीवन आणि राजकारण वेगळे आहे. मुशर्रफ राष्ट्राध्यक्ष असताना प्रतिनिधी मंडळ नेण्याची जबाबदारी स्वीकारली तेव्हा तेथे भरतनाट्यम सादर झाले. या कलावंतांनी आपण मूळचे नागपूरचे असल्याचे अभिमानाने सांगितले. बांगलादेशांत वसंत पंचमीला पिवळ्या साड्यांतील महिला मला दिसल्या. तक्षशिला येथील स्वच्छता डोळ्यात भरते. जगभरात हिंदुस्तानी संस्कृतीचा आदर आहे. जगभरात मंदिरे आहेत. जगभरातील लोक त्यांच्या धार्मिक परंपरा जपतात. आपणही आपल्या परंपरांमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. अर्जेंटिनात भारतीय मंदिर नसले तरी प्रार्थनास्थळ तयार केलेले असून ही हिंदुस्थानची सांस्कृतीक परंपरा आपण जपणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे.

प्रारंभी अ‍ॅड. विलास सोनवणे प्रास्ताविक केले. दिनेश कुलकर्णी यांनी जलसाक्षरतेच्या क्षेत्रात हिंदुस्थान किसान संघ करीत असलेल्या कार्याची माहिती दिली. माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांनी सांगितले की, मूळा धरणाचे काम सुरू असताना माधवराव हे धरण बांधायच्या जागेपासून मूळा नदीच्या उगमपर्यंत ७१ किलोमीटर पायी चालत गेले होते. हे त्यांचे वेगळेपण आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, काहींची मुले परदेशात राहतात मात्र मुले जवळ करत नाहीत. त्यामुळे वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे. यावेळी नामदार बागडे यांच्या हस्ते माधवरावांचा गौरव करण्यात आला. शुभम देशमुख यांनी ‘मातृमंदिर का समर्पित दीप मै’ हे पद्य यावेळी सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद भोगले यांनी केले कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या