मी राणादाच!

मंगेश दराडे । मुंबई

अभिनेता हार्दिक जोशी म्हणजे सगळ्यांचा लाडका राणादा. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला. ‘राणादा’ या नावाने आपल्याला नवी ओळख मिळवून दिल्याचे तो सांगतो. हार्दिकचा अभिनयप्रवास, आकडीनिवडी याविषयी त्याच्याशी केलेली बातचीत…

अभिनेता हार्दिक जोशी म्हणजेच राणादा सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. यापूर्वी त्याने ‘दुर्वी’, ‘लक्ष्य’, ‘पुढचं पाऊल’, ‘क्राईम पेट्रोल’ अशा मालिकांमध्ये काम केले आहे. पण त्याला खरी ओळख मिळाली ती ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे.

आपल्या अभिनयप्रवासाविषयी हार्दिक म्हणाला, खालसा कॉलेजात असताना मी मॉडेलिंग करायचो. अभिनयाच्या क्षेत्रात यायचा माझा विचार नव्हता. मला आर्मीत जायचं होतं. काही कारणात्सव ही इच्छा अधुरी राहिली. त्यानंतर मला काही ऍक्टिंगच्या ऑफर्स येऊ लागल्या. पुढे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या एकांकिकांमध्ये मी काम केले. मात्र ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका माझ्या आयुष्यातली टर्निंग पॉइंट ठरली.

या मालिकेत हार्दिक अस्स्खलित कोल्हापुरी भाषेत बोलताना दिसतो. त्याला पाहून हार्दिक मूळचा कोल्हापूरचाच आहे की काय असा अनेकांचा समज आहे. मात्र हार्दिक मूळचा मुंबईकर आहे. मालिकेला सुरुवात करण्यापूर्वी मी तिथल्या लोकांचे बारकाईने निरीक्षण केले आणि त्यांच्या बोलण्याचा वेग, भाषेचा अचूक लहेजा पकडल्याचे तो सांगतो. मालिकेत जसा राणादा एकही दिवस तालीम चुकवत नाही त्याप्रमाणे खऱ्याखुऱ्या आयुष्यातही हार्दिक एकही दिवस जीमला दांडी मारत नाही. मालिकेला सुरुवात करण्यापूर्वी हार्दिकचे वजन ७२ किलो होते. पण भूमिकेसाठी आपण दीड महिन्यात त्याने २२ किलोपर्यंत वजन वाढवले. गेल्या दीड वर्षापासून त्याने वजन मेंटेन ठेवले आहे. याबाबत तो म्हणाला, मला जिमची खूप आवड आहे. रात्री १२ वाजता शूटिंग संपले तरी मी न चुकता व्यायाम करतो. वजन वाढवण्यासाठी मला अभिनेता जॉन अब्राहमच्या फिटनेस ट्रेनर विनोद खन्ना यांची खूप मदत झाली. मात्र माझी आई हीच माझी पहिली फिटनेस गुरू असल्याचे सांगायलाही तो विसरत नाही. आजही आईचे माझ्या तब्येतीकडे खूप बारकाईने लक्ष असल्याचे हार्दिक सांगतो.

…तरच सिनेमांमध्ये काम करणार

या मालिकेमुळे हार्दिकला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येतायत. मात्र १५ ते २० सिनेमांच्या ऑफर्स आपण नाकारल्याचे तो सांगतो. या मालिकेत मी जसा आहे तशाच लूकमध्ये मी पुन्हा सिनेमांमध्ये झळकणार नाही. मला एकाच इमेजमध्ये अडकायचे नाही. सिनेमात वेगळं काहीतरी करण्यासारखं असेल तरंच मी सिनेमासाठी होकार देईन.

मी निमित्तमात्र…
कुस्ती म्हटलं की, कोल्हापूर हे समीकरण आलंच. या मालिकेमुळे कोल्हापुरात बंद पडलेल्या तालमी नव्या जोमाने सुरू झाल्या आहेत. याबाबत हार्दिक म्हणाला, मी केवळ निमित्तमात्र आहे. माझ्यामुळे पुन्हा तिथल्या तालमी पुन्हा सुरू होत असतील तर ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.