पांड्या-राहुलवर निलंबनाची कारवाई? वन डे मालिकेला मुकण्याची शक्यता


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुलवर कारवाई होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडूल्जी यांनी या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर पुढील कारवाईपर्यंत दोन्ही क्रिकेट खेळाडूंवर निलंबनाची कारवाई करण्याची शिफारस केली आहे.

गुरुवारी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुलवर दोन सामन्यांच्या बंदीची शिफारस केली होती. यावेळी त्यांनी पुढील निर्णय डायना एडूल्जी यांनी कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर घेतला जाईल असेही सांगितले होते. आता एडूल्जी यांनी कायदेशीर सल्ला घेत दोन्ही खेळाडूंना पुढील कारवाईपर्यंत निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी एडूल्जी यांनी बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांचे उदाहरण देत लैंगिक शोषणाचे आरोप लगावल्यानंतर त्यांच्यावरही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध उद्यापासून सुरू होणाऱ्या एक दिवसीय मालिकेला दोन्ही खेळाडू मुकणार हे स्पष्ट झाले आहे. या

स्मिथ आणि वॉर्नरचे दिले उदाहरण
दरम्यान, या प्रकरणी बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने बंदीची झेलत असलेले ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हीड वॉर्नरचे उदाहरण दिले. दोन्ही खेळाडूंना सस्पेंड केल्यानंतर त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. तसेच हा प्रश्न आचार संहितेचा नसून आपण ज्या संस्थेकडून खेळता त्याला बदनामीपासून वाचवण्याचा असल्याचा ते म्हणाले. बॉल टेम्परिंग प्रकरणी आयसीसीच्या आचार संहितेनुसार स्मिथ आणि वॉर्नरवर एका कसोटी सामन्याची बंदी लागू होणार होती, परंतु ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने संस्थेला बदनाम केल्याप्रकरणी त्याच्यावर एका वर्षाची बंदी घातली, असेही ते यावेळी म्हणाले.