रंगीबेरंगी हार्दिक पांड्या, लोकांनी म्हटलं जोकर

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आपल्या खेळीमुळे खूपच लोकप्रिय आहे. हार्दिकच्या खेळीसोबतच त्याच्या स्टाईलचेही अनेकजण चाहते आहेत. त्यामुळेच कित्येकजण त्याला कॉपी करत असतात. हार्दिक एका मासिकातील मुखपृष्ठावर झळकलेल्या त्याच्या फोटोमुळे सध्या जास्तच चर्चेत आला आहे.

‘मॅक्सिम इंडिया’ मासिकाच्या अधिकृत ट्विटवरून यंदाच्या मुखपृष्ठावर हार्दिक पांड्या असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र हार्दिकचा बदललेला हा लूक त्याच्या चाहत्यांच्या फारसा काही पसंतीस उतरला नसल्याचचं दिसून येतं आहे. कारण त्याच्या या लूकवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी तर त्याला सरळ जोकर दिसतोस असं म्हटलंय. लोकांनी त्याच्या या लूकची थट्टा उडवली आहे. तसेच त्याला खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्लाही काहीजण देताना दिसत आहेत.

हार्दिकने देखील त्याचे काही फोटो पोस्ट करत त्याचा हा नवा अंदाज ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आयुष्यात आपल्या आवडीनुसार वागा. स्वत:च्या स्टाईलमध्ये बदल करण्यासाठी कोणालाही घाबरण्याची गरज नाही. बदल ही नवीन सुरुवात असेल अशा आशयाचा संदेश त्याने फोटो शेअर करताना दिला आहे. मात्र एकूणच त्याच्या फोटोवर येणाऱ्या प्रतिक्रियावरुन पांड्याचा हा लूक चाहत्यांना आवडला नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.