हार्दिक पटेल यांची प्रकृती ढासळली, जारी केले मृत्युपत्र


सामना ऑनलाईन । अहमदाबाद

गुजरातमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी, पाटीदार समाजाला आरक्षण आदी मागण्यांसाठी पाटीदार समाजाचे नेत हार्दिक पटेल हे 10 दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. भाजप सरकारकडून कोणतेही आश्वासन अद्याप दिले गेलेले नाही. पटेल यांची प्रकृती ढासळत चालली असून त्यांनी मृत्युपत्र जारी केले आहे. तसेच नेत्रदान करण्याचीही इच्छा बोलून दाखविली आहे.

हार्दिक यांनी आपल्या मृत्युपत्रात लिहिले आहे, ‘भाजपचे सरकार निर्दयी आहे. मी 25 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण करीत आहे. माझे शरीर कमजोर झाले आहे. प्रकृती ढासळत चालली आहे. त्यामुळे मी माझी अंतिम इच्छा जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.’

आईवडील, गोशाळांना मदत
पाटीदार समाजाचे नेते मनोज पनारा यांनी मृत्युपत्राची माहिती दिली. हार्दिक यांनी त्यांच्या बँक खात्यातील 50 हजार रुपयांपैकी 20 हजार आईवडिलांना आणि 30 हजार रुपये चंदननगर गोशाळेला देण्यात यावेत. तसेच हार्दिक यांचे पुस्तक ‘हू टूक माय जॉब’ याची 30 टक्के रॉयल्टी आईवडील आणि बहीण यांना द्यावी तर 70 टक्के रॉयल्टी पाटीदार आरक्षण आंदोलनात मारल्या गेलेल्या 14 युवकांच्या नातेवाईकांना दिली जावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

summary-  hardik patel on hunger strike declared his will