हरिश्चंद्रगडाची परिक्रमा पहिल्यांदाच पूर्ण!

सामना प्रतिनिधी । संगमनेर

हरिश्चंद्रगड हा सह्याद्री पर्वतरांगांचा अतिशय घनदाट जंगलाचा परिसर आहे. या अतिविशाल डोंगररांगांमधून अशक्य वाटणारी हरिश्चंद्रगड-कळसूबाई अभयारण्यातील ‘हरिश्चंद्रगड परिक्रमा’ मुंबई येथील शिवशौर्य गिर्यारोहण संस्थेने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तीन दिवसांत पूर्ण केली. अत्यंत खडतर असणाऱ्या या सुमारे ४० किलोमीटरच्या परिक्रमेत लहान मुले व तरुण-तरुणींसह ३८ जण सहभागी झाले होते. या अभयारण्यातील गिर्यारोहणाच्या इतिहासात ही पहिलीच परिक्रमा ठरली आहे.

प्रजासत्ताकदिनी ध्वजवंदन करून पुणे जिह्यातून सुरू झालेली ही परिक्रमा ठाणे व नगर जिह्यातील डोंगररांगा पार करीत तीन दिवसांत पूर्ण झाली. मुंबई येथील ‘शिवशौर्य ट्रेकर्स’ या संस्थेच्या सुमारे ३८ सदस्यांनी यात सहभाग घेतला होता. यात लहान मुलांसह तरुण-तरुणींचाही सहभाग होता. शार्दुल खरपुडे आणि सचिन कातकर यांनी या परिक्रमा मोहिमेचे नेतृत्व केले. या संपूर्ण मोहिमेत देशाचा राष्ट्रध्वज मोठ्या दिमाखात मिरविण्यात आला.

सकाळी ९ वाजता ध्वजवंदन करून माळशेज घाटाच्या नितांतसुंदर जंगलातून परिक्रमेला सुरुवात करण्यात आली. दुपारी २ वाजता काळू नदीजवळ जेवण आणि पुढील ट्रेक चालू करण्यात आला. सलग नऊ तास चालत व डोंगररांगा चढ-उतार करत सायंकाळी बेलपाडा (वाल्हीवरे) येथे पहिला मुक्काम करण्यात आला.

२७ जानेवारीला सूर्योदयाबरोबरच परिक्रमेला सुरुवात झाली. साधले घाटाची खडी चढण चढून साधले घाट पठारावर दुपारचे जेवण घेण्यात आले. संध्याकाळपर्यंत उंच अशा रौद्रभीषण कोकण कडय़ावर पोहचणे महत्त्वाचे असल्याने कोणताच थांबा न घेता कोकण कड्याचा माथा गाठला. मुक्काम करून २८ जानेवारी रोजी तोलार खिंड, खिरेश्वरमार्गे ही परिक्रमा पूर्ण करण्यात आली.

संस्थेच्या वतीने दरवर्षी पन्हाळा पावनखिंड ते विशाळगड अशी मोहीम राबविली जाते. या वर्षीपासून ही परिक्रमा सुरू केली आहे. गिर्यारोहकांचा असाच प्रतिसाद मिळाला तर हरिश्चंद्रगड परिक्रमा दरवर्षी करण्याचा विचार आहे.
शार्दुल खरपुडे, शिवशौर्य ट्रेकर्स, मुंबई.