केबलचा वाद पेटला, लातुरात ‘हॅथवे’चे ऑफिस जाळले

4
troched-hathway-office-latu

सामना प्रतिनिधी । लातूर

शहरातील औसा रोडवरील कर्जत मंगल कार्यालयाच्या इमारतीत असलेले ‘हॅथवे एमसीएन’चे कार्यालय दोन अज्ञात तरुणांनी पेट्रोल टाकून पेटवले. अग्निशमन विभागाच्या बंबाने ही आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये केबलची कंट्रोल रूम जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

लातूर शहरातील औसारोडवर पारिजात मंगल कार्यालयाच्या इमारती मध्ये तळमजल्यावर आयसीआयसीआय बँकेची शाखा आहे. वरील मजल्यावर आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कार्यालय असून त्याच्या बाजूलाच ‘हॅथवे एमसीएन’चे कार्यालय आणि कंट्रोल रूम आहे. वरील मजल्यावर हॉटेल व्यंकटेशा असून आज दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास केबलच्या कारणावरून दोन युवकांनी बाटलीमध्ये पेट्रोल घेऊन काही समजण्याच्या आत कार्यालयात पेट्रोलचा शिडकाव करून आग लावली. आग भडकातच ते पसार झाले. काही क्षणात या आगीने रौद्ररूप धारण केले. केबलची संपूर्ण कंट्रोल रूम जळून खाक झाली. दरम्यान, अग्निशमन विभागाचे दोन बंब आग विझविण्याचे काम करत होते.