स्त्रीयांवर लैंगिक अत्याचार करण्याचा अधिकार कुणालाच नाही!

सामना प्रतिनिधी, मुंबई

एखाद्या महिलेचा प्रियकर असू शकतो याचा अर्थ असा होत नाही की त्याचा फायदा घेत दुसऱ्या पुरुषाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करावा, असे स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच व्यक्त केले. तसेच आपल्या अल्पवयीन भाचीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीची याचिका फेटाळून लावली.

नाशिक येथील एक आरोपी आपल्या अल्पवयीन भाचीवर सातत्याने बलात्कार करीत असल्याने त्याला ‘पॉस्को’ कायद्याअंतर्गत २०१६ साली १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. एक वर्षानंतर त्याने जामीन मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याची सुनावणी न्यायमूर्ती ए. एम. बदर यांच्यासमोर झाली. तेव्हा एखाद्या महिलेचा अथवा मुलीचा प्रियकर असला म्हणून दुसऱ्या पुरुषाला त्या महिलेवर अत्याचार करण्याचा हक्क नाही, असे न्यायमूर्तींनी सांगितले व आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.