एचडीएफसी उपाध्यक्ष संघवी यांच्या बेपत्ता प्रकरणाचे गूढ वाढले

सामना प्रतिनिधी । मुंबई

बुधवारी नेहमीप्रमाणे कमला मिल येथील कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघालेले एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांच्या बेपत्ता होण्याचे गूढ आणखी वाढले आहे. दोन दिवस लोटले तरी त्यांचा थांगपत्ता लागू शकलेला नाही. मात्र नवी मुंबईत त्यांची गाडी सापडली तेव्हा त्यांचा बंद असलेला मोबाईल त्या स्पॉटला पाच मिनिटांसाठी सुरू करण्यात आला होता. त्यामुळे त्या पाच मिनिटांसाठी संघवी यांचा मोबाईल कुणी सुरू केला होता, हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर आहे.

सिद्धार्थ संघवी हे 5 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कमला मिलमधील कार्यालयातून मलबार हिल येथील त्यांच्या निवासस्थानी जाण्यास निघाले, पण ते घरी पोहोचलेच नाहीत. कार्यालयातून निघालेले संघवी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाले. त्यांची मोटार दुसऱया दिवशी सकाळी नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे आढळली. त्यांच्या मोटारीच्या सीटवर रक्ताचे डाग आढळून आले. ते कार्यालयातून निघाले तेव्हापासून त्यांचा मोबाईल बंद होता; पण नवी मुंबई येथे त्यांची कार व्यवस्थित पार्क केलेली होती. पाच मिनिटांसाठी संघवी यांचा मोबाईल सुरू झाला होता. त्यामुळे त्यांची कार नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे असल्याचे लोकेशन पोलिसांना ट्रेस झाले. त्यामुळे केवळ त्या पाच मिनिटांसाठी त्यांचा मोबाईल कसा सुरू होता, तो कुणी सुरू केला होता त्याबाबत कोणतीच माहिती पोलिसांना मिळू शकलेली नाही. शिवाय कारमधील ड्रायव्हर सीट शक्य होईल तितकी मागे खेचण्यात आली होती. त्यामुळे संघवी यांच्याबाबत सर्व गूढ असून त्याचा उलघडा करण्यासाठी पोलिसांची पथके कामाला लागली आहेत.

दरम्यान, कमला मिल येथे कार्यालयाबाहेर संघवी यांनी कार पार्क केली होती तेथेही रक्ताचे डाग सापडले आहेत. शिवाय त्यांची कार नवी मुंबईला कोणी व कशी नेली, त्या ठिकाणी व्यवस्थित पार्क कोणी केली हे आणि असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असून पोलीस व क्राइम ब्रँचची पथके संघवी यांचा कसून शोध घेत आहेत. कारमध्ये सापडलेले रक्ताचे नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्या नमुन्यांची संघवी यांच्या कुटुंबीयांशी डीएनए तपासणी करण्यात येणार आहे. मात्र अचानक संघवी बेपत्ता झाल्याने सर्वजण हबकले आहेत.