गाडीतील रक्ताच्या डागाने बँक अधिकाऱ्याच्या बेपत्ता होण्याचे गूढ वाढले

सामना ऑनलाईन, मुंबई

एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष असलेले सिद्धार्थ संघवी बुधवारपासून गूढरित्या गायब झाले आहेत. मलबार हिल इथे आपल्या कुटुंबासह रहात असलेल्या संघवी यांची गाडी नवी मुंबईमध्ये सापडली आहे. या गाडीच्या सीटवर रक्ताचे डाग आढळल्याने संघवींचे कुटंबीय हादरले आहेत. गाडीचं कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नसल्याने पोलीसही चक्रावले आहेत.

संघवी बुधवारी कमला मिलमधील त्यांच्या कार्यालयातून संध्याकाळी साडेसातच्या सुमारास निघाले होते. त्यानंतर ते कुठे गेले हे कळू शकलेलं नाही, त्यांचा मोबाईलही बंद असल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत पडले होते. उशिरापर्यंत ते घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी एन.एम.जोशी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी वायरलेस संदेश पाठवत संघवी यांच्या बद्दलची सगळी माहिती प्रसारीत केली. या माहितीशी मिळतीजुळती एक गाडी नवी मुंबईत सापडल्याचं गुरुवारी नवी मुंबई पोलिसांनी एन.एम.जोशी मार्ग पोलीस ठाण्याला कळवलं. गाडीचा नंबर तपासला असता ती संघवी यांचीच असल्याचं सिद्ध झालं आहे.