एचडीएफसीचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची हत्या

murder

सामना ऑनलाईन, मुंबई

बुधवार सायंकाळपासून बेपत्ता झालेले एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची हत्या झाल्याचे अखेर उघडकीस आले आहे. याप्रकरणी चारजणांना ताब्यात घेतले असून त्यापैकी एकाने संघवी यांच्या हत्येची कबुली दिल्याचे समजते. शिवाय संघवी यांचा मृतदेह कल्याणमध्ये सापडल्याचेही सांगण्यात येते. मात्र ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी यास अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

संघवी यांची कार कौपरखैरणे येथे सापडल्यानंतर त्यांचे बेपत्ता होण्याचे गूढ वाढले होते. त्यांचा सर्वत्र शोध सुरू असताना नवी मुंबई क्राइम ब्रँचने रविवारी सर्फराज खान नावाच्या इसमाला संघवी बेपत्ता प्रकरणात ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी ना. म. जोशी मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, संघवी यांची हत्या केली असून त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात माझा सहभाग असल्याचे सर्फराजने नवी मुंबई पोलिसांना सांगितल्याचे सूत्रांकडून समजते. तसेच संघवी यांचा मृतदेह कल्याण येथे जंगलात फेकल्याचेही त्याने सांगितल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले. मात्र मुंबई पोलिसांनी याबाबत कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

बँकेतील महिला अधिकाऱयासह चौघे रडारवर

सिद्धार्थ संघवी यांची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात सर्फराज खान याला ताब्यात घेतल्यानंतर आणखी तिघांची नावे समोर आली. संघवी यांच्या दोघा सहकाऱयांना ताब्यात घेतले असून त्यात एका महिलेचा समावेश असल्याचे समजते.

चार संशयित ताब्यात; एकाने कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा

संघवी यांच्या हत्येची कबुली देणारा सर्फराज हा खासगी टॅक्सी ड्रायव्हर असून त्याला घेऊन पोलीस पथक रात्री कल्याणमध्ये गेले होते. तेथे संघवी यांचा मृतदेह सापडल्याचे समजते.