राजकीय प्रवेशानंतर सुब्रमण्यम स्वामींची रजनीकांत यांच्यावर टीका

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांनी २०१७ वर्ष संपण्याआधी चाहत्यांना अनोखी भेट दिली. राजकीय पक्षाची घोषणा करत त्यांनी आपला राजकारणातील प्रवेश निश्चित केला. मात्र रजनीकांत यांचा राजकीय प्रवेश भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांना फारसा आवडलेला दिसत नाही. स्वामी यांनी रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशानंतर टीका केली आहे. एकीकडे रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशाची सर्वत्र चर्चा होता असताना, ही फक्त माध्यमांनी दिलेली हवा असल्याचे वक्तव्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे.

सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, रजनीकांत यांनी फक्त राजकीय प्रवेशाची घोषणा केली आहे. त्याविषयी कोणतीच विस्तारित माहिती किंवा कागदपत्र सादर केले नाहीत. ते अशिक्षित आहेत. किंबहुना माध्यमांनी उगाचच हवा देऊन त्यांना मोठे केले आहे. तसेच तामिळनाडूची जनता हुशार आहे, त्यांना हे सर्व लक्षात येईलच असंही स्वामी म्हणाले.’

एकीकडे रजनीकांत यांच्यावर टीका होत असताना, त्यांच्या चाहत्यांमध्ये मात्र उत्साहाचं वातावरण आहे. राजकीय पक्षाची स्थापना करून तमीळनाडूतील आगामी विधानसभा निवडणुकीत २३४ जागांसाठी लढणार असल्याचं रजनीकांत यांनी स्पष्ट केलं. ‘नेते राजकारणाच्या नावावर आपला पैसा लुटत आहेत आणि त्यामुळेच आता इथल्या राजकारणाची व्यवस्था बदलणं गरजेचं आहे. आज भ्रष्टाचाराने सगळी व्यवस्था पोखरली गेली आहे आणि राजकारण फक्त एक देखावा उरला आहे. म्हणूनच जेव्हा कधी सत्तेचा दुरुपयोग केला जाईल, तेव्हा त्याविरोधात मी नेहमीच लढत राहीन.’ असं रजनीकांत यांनी म्हटलं आहे.