आरोग्यदायी दूध

8

>>डॉ. दीपक केसरकर

दूध… आपल्या आहारातील अविभाज्य घटक. आज जागतिक दुग्ध दिनानिमित्त जाणून घेऊया दुधाविषयी सविस्तर…
दूध ही दोन अक्षरे खूप मोठी व्याप्ती सांगून जातात. रसायन वाचल्यावर घाबरला नाहीत ना. आपल्या हिंदुस्थानी शास्त्रात रसधातूपासून शुक्रधातूपर्यंत शरीरातील सप्तधातूचे पोषण करणारे म्हणून रसायन हे विशेषण आलेय. रसायन म्हटले की डोळय़ासमोर केमिकलशिवाय काही येतच नाही. यात आपला काहीच दोष नाही. सध्या भवतालच्या घडामोडींमुळे असा विचार करण्यास भाग पाडले जातेय.

हिंदुस्थानी शास्त्रात आठ प्रकारची दूध वर्णन केली आहेत. त्यात गाईचे, म्हशीचे, शेळीचे, उंटिणीचे, स्त्रीचे, मेंढीचे, हत्तीणीचे व एकखुराच्या प्राण्याचे दूध यांचा समावेश होतो. यात गाईचे दूध सगळय़ात उत्तम सांगितले आहे. सध्या व्यवहारात मात्र गाईचे दूध, म्हशीचे दूध, शेळीचे दूध, सोया दूध यांचा वापर करताना दिसून येतो.

गाईचे दूध
‘अत्र गव्यं तु जीवनीयं रसायनम्।
क्षतक्षीणहितं मेध्यं बल्यं स्तन्यकरं सरभ।।
श्रम भ्रम मद अलक्ष्मी श्वासकासतितृक्षुधः।
जीर्ण ज्वरं मुत्रकृच्छं रक्तपितं च नाशयेत।।
आष्ठांग हृदय सूत्र ५/२

गाईचे दूध जीवनीय रसायन मेध्व बल्य स्तन्यवर्धक सारक असून उरक्षती क्षयी मनुष्यांना हितकारक आहे. श्रम, भ्रम, मद निस्तेजता श्वास कास अतितृष्णा अतिभूक जीर्णज्वर मुत्रकृच्छ रक्तपित्त यांचा नारा करते.

म्हशीचे दूध –
हितमत्यग्नयनिद्रेभ्यो गरीयो महिषं हिमम्।
म्हशीचे दूध गाईच्या दुधापेक्षा अधिक जड व थंड असून ज्यांना भूक फार लागते व निद्रा येत नाही अशा लोकांना हितकर आहे.

शेळीचे दूध –
टी.बी. आजाराने ग्रस्त रुग्णांना शेळीचे दूध देतात. बाजारात शेळीच्या दुधाच्या बॉटल्स उपलब्ध आहे. शेळय़ा पाणी थोडे पितात. व्यायाम फार करतात. तिखट व कडू चवीची झाडांची पाने खातात म्हणून त्यांचे दूध पचायला हलके व क्षय (टीबी), ताप, श्वास (दमा), रक्तपित्त, अतिसार या आजाराला बरे करतात.

सोया मिल्क-
अत्याधिक प्रोटिनयुक्त आहार म्हणून सोया मिल्कची प्रसिद्धी आहे. बॉडी बिल्डर, अॅथलेटिक्स व्यायामासोबत शरीर भरून निघण्यासाठी सोया मिल्कचा वापर करतात. हे पचनाला जड आहे; परंतु अत्याधिक प्रोटिनयुक्त आहे.

अशाप्रकारे दूध हे चवीने मधुर स्निग्ध तेजोवर्धक, धातुवर्धक, शुक्रवृद्धीकर, वातपित्तहारक, कफकारक, जड व शीतल आहे. असे अमृतासमान असलेल्या दुधाकडे नाक मुरडणारी आताची पिढी भविष्यात रोगप्रतिकारकशक्ती कमी पडते म्हणून वारंवार आजारी पडताना दिसते. शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांचे आजार पांडुसारखे आजार शरीर न भरणे यासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.

मागे एका सर्वेक्षणामध्ये हा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला असा की, दुधाच्या वाढत्या मागणीमुळे अधिक दूध गाईकडून मिळावे म्हणून त्यांच्या खाण्यामध्ये अथवा इंजेक्शनद्वारे हार्मोन्स गाईंना द्यायला लागले. हार्मोन्सचे प्रमाण दुधाच्या माध्यमातून लहान मुलीच्या शरीरात बदल लवकर घडू लागले. त्यामुळे वयाच्या १६व्या वर्षी येणारी मासिक पाळी वयाच्या अकराव्या वर्षी यायला लागली. त्यामुळे वयाच्या ३५-४० वर्षांत मासिक पाळी बंद होऊ लागली. शिक्षणामुळे वयाच्या३०-३५ ला लग्न आणि त्यादरम्यान मेनोपॉझ (पाळीमध्ये अनियमितता) म्हणून वंध्यत्व (मूल न होणे) या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. याचा कुठेतरी विचार व्हायला हवा एवढीच विनंती आहे.

कारण आईनंतर दुसरी आई म्हणजे गोमाता. ती निस्वार्थभावाने तिच्या पालनकर्त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे पोषण करत असते. अशा ईश्वरी शक्तीसंपन्न (दुधापासून ते शेणापर्यंत सगळे गुणकारी) गाईचा काही रुपयांसाठी अवमान करू नका.

भेसळयुक्त दूध ओळखण्याच्या घरगुती पद्धती- शुद्ध दुधाला मंद सुगंध असतो. तर भेसळयुक्त दुधाला उग्र वास येतो. शुद्ध दूध चवीला गोडसर असते. भेसळयुक्त दूध चवीला थोडे कडू लागते. शुद्ध दूध स्टोअर करून ठेवलात तर ते पांढरेच असते तर भेसळयुक्त दुधाचा रंग पिवळसर होतो. शुद्ध दूध तळहातावर घेतल्यावर हातावर काही जमा होत नाही. तेच भेसळयुक्त दूध तळहातावर चोळल्यास हातावर चिकट पदार्थ तयार होतो. शुद्ध दुधात हळद टाकल्यास दूध पिवळे होते. तेच भेसळयुक्त दुधामध्ये टाकल्यास लाल रंग येतो.

आपली प्रतिक्रिया द्या