जाणून घ्या बाप्पाला आवडणाऱ्या डाळिंबाचे फायदे

वैद्य दीपक केसरकर

बाप्पाची प्रत्येक आवड ही लोकोपयोगी आहे. लालचुटूक डाळिंब अत्यंत आरोग्यदायी आहे.

लालचुटूक डाळिंब… गणरायाचं अत्यंत आवडतं… त्याच्या पुजेतील पाच फळांत डाळिंबाचा मान अग्रस्थानी. अत्यंत दूरदृष्टीने बाप्पाने आपल्या प्रत्येक आवडत्या गोष्टीची निवड केली आहे. लोकोपयोग, लोकप्रबोधन हे त्याच्या प्रत्येक आवडीचे मूळ आहे. डाळिंबाचे मूळ हे संपूर्णतः आरोग्याशी निगडीत आहे.

डाळिंब हे पित्तशामक असल्याने गर्भवती स्त्रीला जर उलटी, मळमळ होत असेल तर डाळिंबाचा रस दर दोन दोन तासांनी ३-४ चमचे प्यायला दिला तर फायदा होतो. अति ताप आल्यावर पथ्यकर आहार म्हणून डाळिंब किंवा डाळिंबाचा रस द्यावा. तापामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता गोड डाळिंबाने कमी होते व ताप नाहीसा होतो. विशेष म्हणजे चिरतारुण्य टिकवण्यासाठीही रोज फक्त एखादे डाळिंब खाल्ले तरी पुरेसे आहे.डाळिंब रस व आवळा रस एकत्र करून त्यामध्ये खडीसाखर घालावी व आठ दिवस उन्हात ठेवावे, तयार झालेले सरबत रोज १ कपभर प्यावे. यामुळे  शरीर मजबूत, काटक व सुंदर बनते.

अपचन, आम्लपित्त, ताप यामुळे जर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून खाल्ल्याने तोंड स्वच्छ होऊन दुर्गंधी नष्ट होते. घसा दुखायला लागला, तोंड आले, तर डाळिंबाच्या सालीच्या काढय़ाने गुळण्या कराव्या. लाल रंगाचे दाणे असलेले गोड डाळिंब हे रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक आहे. त्यामुळे ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे त्यांनी रोज एक डाळिंब खायचे. डाळिंबाचा रस अतिसार, मुरडा, संग्रहणी, आम्लपित्त, पांडुरोग, जुनाट ताप, खोकला इ. आजारांवर गुणकारी आहे. काही विकारात अशक्तपणा आला असेल तर डाळिंबाचा रस प्यायचा. हृदय बळकट करण्यासाठी डाळिंबाच्या रसात केशर, लाल गूळ व वेलची घालून त्याचे सरबत करावे व रोज थोडे थोडे प्यावे. यामुळे रक्ताभिसरण क्रिया सुधारते.

असेही काही उपयोग

  • डाळिंबाची आंबट गोड चव ही तोंडाला चव आणणयासाठी, भूक वाढविण्यासाठी अधिक उपयोगी आहे. पचनसंस्थाही सुधारते.
  • अपचन, पोटात गॅस धरणे, शौचास साफ होत नसेल तर रोज एक डाळिंब खावे. यामुळे जाठराग्नी, प्रदीप्त होऊन अन्न पचते व बियांमधील चोथ्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.
  • उलटय़ा होत असतील तर डाळिंबाचा रस चाटवावा किंवा अन्न शिजवताना त्यात डाळिंब घालावे.
  • पोटात होणारे चपटे कृमी, लांब जंत हे डाळिबांच्या सालींमधील अल्क गुणाने मरतात. याचा काढा सलग तीन दिवस १ ग्लासभर दिवसातून ३ वेळा द्यावा याने सर्व प्रकारचे जंतकृमी पडून जातात.
  • डाळिंबाची कळी किंवा फूल हे स्त्रीयांच्या मासिक पाळीच्या तक्रारी दूर करण्यासाठी उपयोगी पडते. विशेषतः स्त्रीला बीज फुटणे ही क्रिया या फुलाने चांगली होते.
  • पित्त वाढल्यामुळे सारखी तहान लागत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून खायचे किंवा डाळिंबाच्या दाण्यांचा घोट-घोट रस घ्यायचा.
  • डाळिंबाच्या सालीचा तुकडा तोंडात ठेवून त्याचा रस चोखल्याने जुनाट खोकला बरा होतो.
  • डाळिंबाचे दाणे वाटून त्याचा रस काढून जायफळ, सुंठ, लवंग पूड घालून त्यात मध घालावा. हा रस २-२ चमचे तीन वेळा प्यायल्यास पोटदुखी, आम्लपित्त हे विकार कमी होतात.
  • तापामुळे तोंडाला आलेला बेचवपणा घालवण्यासाठी डाळिंबाच्या रसाची पेज करून प्यायला द्यायची.