परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा पुरविण्यासाठी तज्ञ शोधणार तोडगा

टाटा रुग्णालयाच्या वतीने तीन दिवसीय परिषदेचे आयोजन
मुंबई – कर्करोगावर परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी टाटा मेमोरियल सेंटरच्या वतीने तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आरोग्यसेवा उपयुक्त किंवा मानवाची मूलभूत गरज’ म्हणजेच ‘हेल्थकेअरः अ कमॉडिटी ऑर बेसिक ह्युमन नीड’ या विषयावर २७ ते २९ जानेवारी दरम्यान ही परिषद पार पडणार असल्याची माहिती टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी दिली.

पत्रकार परिषदेत कार्यक्रमाविषयी माहिती देताना टाटा मेमोरियल सेंटरच्या एसीटीआरईसीचे उपसंचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी परिषदेचा आराखडा सर्वांसमोर मांडला आणि परिषदेच्या तीन दिवसांत प्रसारमाध्यमांना काय पाहायला मिळेल, याची सविस्तर माहिती दिली.

‘हिंदुस्थान आरोग्यसेवेची सुलभता आणि आरोग्यसेवेचे परवडणारे दर ही दोन महत्वाची आव्हाने सर्वांनाच भेडसावतात. या परिषदेच्या निमित्ताने प्रमुख धोरण नियोजनकार आणि या क्षेत्रातील विस्तृत भागधारकांना या विषयावर आपली भूमिका मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळणार असल्याचे डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले.

सर्जिकल आँकॉलॉजी विभागाचे प्रोफेसर आणि प्रमुख डॉ. सी. एस. प्रमेश यांनी देशातील असमानता आणि विविधतेच्या दृष्टीने आरोग्यसेवा प्रणालीची तातडीने गरज असल्याच्या मुद्यावर भर दिला. सेंट ज्युड इंडिया चाइल्डकेअर सेंटर्सचे संस्थापक निहार रविरत्ने यांनी प्रगतीचे वारे वहात असतानाही, तशाच प्रकारची प्रगती तंत्रज्ञान आणि आरोग्याच्या बाबतीतही व्हायला हवी. देशातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात उपचार मिळण्यासाठी विचारमंथनाची आवश्यकता असल्याचे सांगितले.

या परिषदेत अर्थतज्ञ, प्रशासकीय तज्ञ, चिकित्सक, साथरोग शास्त्रज्ञ, औषधोत्पादन कंपन्यांचे प्रमुख आदी तज्ञ मंडळी सहभागी होणार आहेत.