राजस… पौष्टिक लाडू

>> शमिका कुलकर्णी, आहारतज्ञ

लाडू. एक राजस आणि पौष्टिक पदार्थ. थंडीच्या दिवसांत डिंक, मेथी, अळीव या घटकांपासून केलेले लाडू आवर्जून खावेत.

लाडू हा विषय आरोग्याच्या पानावर… जरा दचकलात ना…? अनेक राजस पदार्थांनी युक्त असलेला हा पदार्थ आरोग्य विभागात कसा…

मुळात आरोग्य म्हणजे रुक्ष, निरस, कडवट नव्हेच… छान, निरोगी, रसपूर्ण, आनंदी, सर्व गोष्टींचा आस्वाद घेऊन जगणे म्हणजे आरोग्य. अन्न हा आरोग्याचा अविभाज्य भाग. कोणतेही अन्न कधी वाईट असूच शकत नाही. चुकीची असते ती खाण्याची वेळ, ऋतू आणि प्रमाण…

सध्या मोसम मस्त उबदार थंडीचा आहे. आपण घेत असलेल्या आहाराला छान व्यायामाची जोड सातत्याने दिली तर ठणठणीत आरोग्याची हमी अगदी कायम. हिवाळय़ातील अनेक पदार्थांमध्ये लाडू खूप पौष्टिक आणि सर्वांनाच आवडणारे असतात. मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू, अळीवाचे लाडू, कणकेचे लाडू, मुगाच्या पिठाचे लाडू असे अनेक लाडू केले जातात. या लाडवांमध्ये कणीक, गूळ, मेथी, डिंक, सुका मेवा, अळीव, खारीक, तूप असे अनेक पौष्टिक आणि शरीराला आवश्यक असे पदार्थ असतात. थंडीच्या ऋतूत या पौष्टिक लाडवांचा समावेश आवर्जून प्रत्येकाने आपल्या आहारात केला पाहिजे.

कणीक
हा मुख्य पदार्थ लाडू करण्यास वापरला जातो. कणकेत कर्बोदके असल्याने शरीराला ऊर्जा मिळते. कणकेत असलेली ब जीवनसत्व व तंतुमय पदार्थ आरोग्याला गुणकारी असतात. त्याचबरोबर अनेक खनिजे असतात. कणिकेमुळे लाडूंना मुख्य पदार्थ मिळतो व लाडू खाण्याचे समाधान वाढते.

मेथी
मेथी कडवट असली तरी अतिशय गुणकारी असते. थंड वातावरणात उष्णता देते. मेथीमध्ये अ, क जीवनसत्त्वे असतात व खनिजे असतात. त्यातील तंतुमय पदार्थ आरोग्याला गुणकारी असतात व रक्तातील साखर हा कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यात मदत करतात. शरीरातील विषाणू बाहेर टाकण्यात मदत होते. बाळंतपणात मेथीचे लाडू खायला आवर्जून देतात कारण मेथीमुळे दूध तयार होण्यास मदत होते.

गूळ
ऊर्जा मिळते. त्याचबरोबर विषाणू बाहेर टाकण्यात मदत होते. रोग प्रतिकारक शक्ती वाढते. लोह आणि फोलेट असल्याने अनेमियावर गुणकारी.

डिंक
डिंक अतिशय पौष्टिक आणि ऊर्जा देणारे असते. पाठदुखी, हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त असतात. बाळंतपणात दूध तयार करण्यास मदत होते. डिंकात प्रथिने व ca चे प्रमाण जास्त असल्यामुळे ते शरीराला गुणकारी. उष्ण असल्यामुळे थंडीत योग्य. शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत होते. म्हणूनच थंडीत सर्दी खोकल्यापासून संरक्षण मिळते.

सुका मेवा
सुक्या मेव्यामध्ये काजू, बदाम, अक्रोड, बेदाणे, मनुका, खारीक असे अनेक जिन्नस असतात. हे सर्व आरोग्यदायी आहेत व शरीराला योग्य जीवनसत्त्व आणि खनिजे यांचा पुरवठा करतात. हिवाळय़ात सुका मेवा शरीराला ऊर्जा देतो. त्याचबरोबर आवश्यक स्निग्ध पदार्थांचा पुरवठा करतो. अ, ब, क, ई जीवनसत्त्वे व ca, F, Ng, Zn सारखी खनिजे देतो.

अळीव
अळीव हा अतिशय पौष्टिक असून जीवनसत्त्वे व खनिजे यांचा साठा असतो. अळीवात लोह, फोलेट, ca क,अ जीवनसत्त्व असतात. मलसारक असते. हाडे मजबूत करतात. मासिक पाळी नियंत्रित ठेवण्यात मदत होते. अनेमियासाठी उपयुक्त असते.

अळीवचे लाडू
साहित्य – १ वाटी अळीव, २ नारळ, १/२ कि. गूळ
कृती – अळीव २ तास पाण्यात भिजत ठेवावे, भिजलेले अळीव गूळ व खोबरे मंद आचेवर शिजवायला ठेवावे. पाण्याचा अंश जाईपर्यंत शिजवावे. गार झाले की लाडू वळावे.

पौष्टिक लाडू
साहित्य – १/२ कि. कणीक, १०० ग्राम मेथी पूड, १०० ग्राम डिंक, १ वाटी काजू-बदाम पूड, १/२ वाटी खारीक पूड, १/२ कि. गूळ, अळीव, तूप.

कृती – कणीक तुपावर भाजून घ्यावी. गरम कणीक आणि गूळ एकत्र करावे. त्यात काजू, बदाम पूड, खारीक पूड, भाजलेले अळीव आणि तुपावर परतलेली मेथी पूड घालावी. हे सर्व एकत्र करून ते एकजीव करावे व लाडू वळावे.