तहान लाडू… भूक लाडू…

<शेफ मिलिंद सोवनी> [email protected]

पर्यटन विशेष खाऊशिवाय कसा पूर्ण होणार… पाहूया प्रवासात करायची पोटपूजा…

प्रवास करताना खाण्याच्या बाबतीत लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यावेळी आपली ऊर्जा टिकण्याची जास्त गरज असते. कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे वातावरण असते. त्यावेळी शरीरामध्ये ऊर्जा टिकवणं गरजेचं असतं. अशावेळी जास्त खाल्लं तर स्थूलपणा किंवा आळस येऊ शकतो. झोपावंसं वाटू लागतं. त्यामुळे प्रवासात खाद्यपदार्थ असे असले पाहिजेत जे पौष्टिक आहेत, कमी तेलाचे आहेत आणि जड असू नयेत. हलकेफुलके पदार्थ असावेत. म्हणजे पोहे. चिवडा… पण होतं काय त्यातून आपल्याला ताकद मिळत नाही. ते शक्तीवर्धक असले तर जास्त चांगलं. म्हणजेच त्यात सुका मेवा किंवा सनफ्लॉवरच्या बिया असल्या तर त्यामुळे शरीराला शक्तीही मिळेल. काही फळंही खायला चांगली असतात.

प्रवासासाठी जाण्यापूर्वी कोणते पदार्थ न्यायचे त्यात चिवडा हमखास असला पाहिजे. तो तळलेला असण्यापेक्षा भाजलेला असेल तर जास्त चांगलं. नंतर या यादीत खाकरा, पापडा, ड्राय भेळ किंवा चिक्की नेता येईल. ऊर्जा कायम ठेवण्यासाठी चिक्की फार चांगला पदार्थ आहे. आता या चिक्कीचेच महागडे प्रकारही अलिकडे बाजारात मिळू लागलेत. म्हणजे एनर्जी बार वगैरे… तेदेखील चिक्कीचेच प्रकार असतात. काही सॅण्डविचेसही प्रवासात नेता येतील. शक्ती टिकवण्यासाठी मग चीज सॅण्डविच बनवून नेणं बेस्ट… काही कुकीज, मफींग, कप केक्स हेदेखील खूप दिवस टिकतात, सॉफ्ट असतात. मुलांनाही आवडतात. मराठी पदार्थ म्हणायचं तर प्रवासात बाकरवडी, शंकरपाळे, तिखट शंकरपाळे, गाजर हलवा हे पदार्थ नेता येतील.

शेंगदाण्याचे लाडू

साहित्य..१ कप शेंगदाणे, १ कप गूळ, वेलचीची थोडी पूड, जायफळ पावड,२ चमचे तेल.

कृती..प्रथम शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून घ्या. मग गूळ, वेलची आणि जायफळ मिक्सरमधून काढून घ्या. त्यांतर एका वाडग्यात हे सर्व मिश्रण एकत्र करायचे. त्यातील थोडा भाग घेऊन त्याला लाडवासारखा गोल आकार देऊन लाडू वळला की बाजूला ठेवायचा. असेच सगळे लाडू बनवून घ्यायचे. त्यानंतर ते हवाबंद डब्यात भरून ठेवायचे. प्रवासाला शेंगदाण्याचे हे लाडू उत्तम.

मसाला मठरी

साहित्य ..१ कप साधा मैदा, पाव चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे, १ चमचा मसाला पावडर, अर्धा चमचा काळीमिरीची ताजी पूड, १ चमचा फेटलेले तूप, मीठ चवीपुरते, तळण्यासाठी तेल.

कृती.. प्रथम एका खोलगट भांडय़ात सर्व साहित्य एकत्र करा. त्यात पुरेसे पाणी घालून त्याचे चांगले मळून घ्या. मग मिश्रणाचे ५ सारखे भाग करून घ्या. त्यानंतर या एकेका भागाचे किमान १०० मि.मि. (४ सेंटीमीटर) रोल बनवा. डिझाईन म्हणून या मठरीच्या किनाऱयांना चिमटीने थोडा आकार द्या. ठरावीक अंतरावर मठरीला एकेक भोक पाडायचे. हाच प्रकार बाकी राहिलेल्या चार मठरींबाबतही करायचा. त्यानंतर एका कढईत तेल गरम करून सर्व मठरीज मध्यम आंचेवर गुलाबी होईपर्यंत तळून घ्यायच्या. तेल निथळण्यासाठी आधी त्या कागदावर काढायच्या. या मसाला मठरीज हवेदार डब्यात ठेवून प्रवासाला नेता येतील. आंब्याच्या लोणच्याबरोबर या मठरीज छान लागतात.

मसाला-ओवा पुरी

साहित्य..गव्हाचे पीठ २५० ग्रॅम, गव्हाची लापशी २५ ग्रॅम, १ चमचा ओवा, अर्धा चमचा हळद पावडर,१ चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कसुरी मेथी, पाणी आवश्यकतेनुसार, गरम तेल, तीळ अर्धा चमचा, मीठ चवीनुसार.

कृती..प्रथम गव्हाचे पीठ, हळद, ओवा, लाल तिखट, कसुरी मेथी, गव्हाची लाप्शी असे सगळे पदार्थ एकजिव करून घ्यावेत. नंतर एकजीव केलेल्या मिश्रणात थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यावे. मळलेली कणीक कापडाने झाकून २० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावी. २० मिनिटांनी फ्रीजमध्ये ठेवलेली मळलेली कणिक काढून तिचे छोटे गोळे करून ६ इंच व्यासाची पुरी लाटावी. त्यानंतर पुरी तळण्यासाठी तेल गरम करावे. गरम तेलात लाटलेल्या पुऱया पिवळसर रंग येईपर्यंत तळाव्यात. पुऱयांमधील पूर्णतः निथळून घ्यावे. तळलेल्या गरमागरम पुरी लोणचे किंवा चटणीबरोबर खाण्यासाठी सर्व्ह करावी.