पौष्टीक नाश्ता

संगीता भिसे। पुणे

दिवसाची सुरुवात नाश्त्याने होत असल्याने आहारात याला विशेष महत्व आहे. नाश्तामुळे आपल्याला दिवसभराची एनर्जी मिळते. यामुळे सकाळच्या नाश्तामध्ये चविष्ट रुचकर पदार्थांबरोबरच पौष्टीक पदार्थांचा आवर्जून समावेश करावा.

गाजराच्या पौष्टिक वड्या 

साहित्य:– तीन वाट्या गाजराचा किस, दोन वाट्या गव्हाचे पीठ, एक वाटी बेसन, एक वाटी सोयाबीनचे पीठ, ७ते ८ हिरव्या मिरच्या, दोन इंच आलं, एक चमचा तीळ, एक चमचा लाल तिखट,अर्धा चमचा धणे पावडर,दोन चमचे जिरे, पावडर,थोड़े दूध, मीठ चवीनुसार

कृति:– पराती मध्ये गाजराचा किस, सर्व पीठ, मिरची आल्याची पेस्ट, तीळ व मसाले मिक्स करून दुध घालून पीठ भिजवा, पीठ जास्त घट्ट किंवा सैल नसावे. हाताला तेल लावून  पीठाचे मोठे रोल तयार करा. चाळणीला तेल लावून त्यात रोल ठेवा, पातेल्यात पाणी घेऊन गॅस वर ठेवा, पाणी उकळल्यावर त्यावर चाळणी ठेवा. १० ते १२ मिनिटे वाफवून घ्या. रोल गार झाल्यावर त्याच्या गोल वड्या कापा. वरुन हिंग मोहरी व तिळाची खमंग फोडणी घाला.सॉस बरोबर खायला दया.

 बाजरीचे पौष्टिक मुटके

bajra-mutke

साहित्य…दोन कप बाजरीचे पीठ, एक कप तांदुळाचे पीठ, एक वाटी सोललेला मटार, दोन वाटया कोथिंबिर, ४ ते ५ मिरच्या, एक इंच आलं, एक चमचा धणे पावडर, एक चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, एक चमचा हळद, एक चमचा हिंग, मीठ चवीनुसार

कृति:-
मटार मिरच्या आणि आलं यांची पेस्ट करून घ्या. परातीमध्ये दोन्ही पीठे एकत्र करुन घ्या. त्यामधे कोथिंबिर, मटारचे मिश्रण, सर्व कोरडे मसाले, तीळ, मीठ हे मिश्रण चांगले मळुन घ्या, गरज पडल्यास थोड़े पाणी घाला. हाताला तेल लावून  मुटके वळून घ्या.चाळणीला तेल लावून त्यात मुटके ठेवा, पातेल्यात पाणी घेऊन गॅस वर ठेवा, पाणी उकळल्यावर त्यावर चाळणी ठेवा. दहा मिनिटे वाफवून घ्या.कढई मधे तेल तापवून तीळ घाला. त्यावर मुटके घालून चांगले परतवून
घ्या. हिरवी चटणी अथवा सॉसबरोबर सर्व्ह करा.