Healthy उपवास

सामना ऑनलाईन, मुंबई

वटपौर्णिमा….पती-पत्नीमधील प्रेमाची गाठ साताजन्माची करण्याचा दिवस. पण आजच्या धावपळीच्या युगात वटपौर्णिमेचे हे प्रेमळ उपवास कसे करावेत? महिलांच्या आयुष्यात महत्त्वाचे मानले जाणारे व्रत म्हणजे ‘वटपौर्णिमा’. ज्येष्ठ पौर्णिमा या तिथीला पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे क्रत करतात. पतीचे प्राण परत मिळवणाऱ्या सावित्रीच्या पातिक्रत्याचे प्रतीक म्हणून हे क्रत केले जाते. सावित्री आणि यमाचे वटवृक्षाखाली संभाषण झाल्यामुळे या दिवशी वटवृक्षाला महत्त्व प्राप्त झाले.

चातुर्मासात सांगितली जाणारी सर्व व्रतवैकल्ये आरोग्यासाठी हितकारक आहेतच. शिवाय ती वेगवेगळ्या सांसारिक समस्यांवरही उपयुक्त आहेत. चातुर्मासाच्या अनेक कहाण्यांमधून स्त्रीयांचं समुपदेशन (काऊन्सिलिंग) करण्यात येते. पूर्वीच्या काळी शारीरिक, मानसिक, बौद्धिक समस्यांवर समुपदेशन करणारे  समुपदेशक नव्हते. त्यामुळे अध्यात्म शास्त्राच्या आधारे  चातुर्मासाच्या कहाण्यांमधूनच आरोग्य, स्वास्थ्य मानसिक, बौद्धिक समस्या सोडवण्याचे उपदेश केले जात असत.  वेगवेगळ्या समस्यांवरील उपाय या कहाण्यांमधून सांगितले जायचे. वटपौर्णिमेचे व्रत पती-पत्नींमधील प्रेम, सामंजस्य टिकून राहावे याकरिता केले जाते. याशिवाय पतीच्या आरोग्याची काळजी घेणे हाही महत्त्वाचा भाग यामध्ये येतो. आधुनिक काळात एखादी पत्नी जेव्हा आपल्या पतीसाठी अवयवदान करते तेव्हा ती त्याचे प्राण यमाकडून मागूनच आणते असे मानायला हवे. हेही खरं सावित्रीचंच क्रत आहे. कोणत्याही अवडंबरामध्ये न अडकता स्त्रीयांनी आपल्या इच्छेनुसार हे व्रत करावे. कोणतेही व्रत म्हणजे ‘वसा’. वसा म्हणजे कोणतीही गोष्ट निष्ठेने करणे. आजच्या सावित्रींनी या दिवसापासून आपल्या कुटुंबाचे आरोग्य निष्ठेने जपण्याचा, कुटुंबाच्या स्वास्थ्याचा वसा घ्यायला हवा.

उपवास हा या क्रताचा आत्मा. आत्यंतिक प्रेमाच्या नात्यातला हा उपवास शक्यतो केला जातोच. मग हा उपवास आरोग्यपूर्ण आणि नात्यांमधील गोडवा वाढवणारा कसा होईल हे आपण पाहूया.

तीन दिवसांचा उपवास कसा कराल?

काही स्त्रीया ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत त्रीरात्र हे क्रत करतात. हल्ली कामानिमित्त बाहेर राहणाऱया महिलांना तीन दिवस हा उपवास करणे शक्य नसते. अशा वेळी काही जणी फक्त पौर्णिमेच्या दिवशी उपवास करतात. तीन रात्र संपूर्ण किंवा पौर्णिमेच्या दिवशी उपवास केला तर फलाहार करावा. तसेच नारळपाणी, लिंबू पाणी, कोकम सरबत, दूध असा रसाहार करावा किंवा उकडलेल्या भाज्या, भाजलेली कडधान्ये यांचे सेवन करावे.

लघू आहार घ्या

आयुर्वेदानुसार वटपौर्णिमेच्या दिवशी पचायला हलका, गरम, स्निग्ध असलेला लघू आहार घेण्यास सांगितले आहे. मूग, मुगाची डाळ, फळे, लाह्या, डाळी, सातू, सालीचे तांदूळ, भाजलेले अन्न (कडधान्ये इत्यादी) हे पदार्थ खाऊन उपास करता येतो.

नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी वटपौर्णिमा

नोकरी करणाऱया महिला वडाची फांदी आणून त्याची पूजा करतात. त्यामुळे वृक्षतोड होते. त्याऐवजी प्रत्यक्ष वडाची पूजा केली तर या झाडाच्या आरोग्यदायी आणि सात्त्विक लहरींचा महिलांना लाभ मिळू शकतो. भावनिक क्रतही महिला करू शकतात. भावनिक क्रत म्हणजे पतीबरोबर सामंजस्य, प्रेम, जपणूक वाढवणे. त्यामुळे कुटुंबालाही लाभ होईल. बऱ्याच जणींना उपवास करण्याची हौस असते. मात्र ‘उपवसनम् इति उपवासम्’ अशी उपवासाची संकल्पना आपल्याकडे आहे. म्हणजे ज्याच्यासाठी आपण उपवास करत आहोत त्याच्या सान्निध्यात राहणं. यासाठी दिवसभर भक्तिमय वातावरण आणि विचारात राहण्याचा प्रयत्न करणे. साबुदाण्याची खिचडी, बटाटय़ाची भाजी असे पिष्ठमय पदार्थ खाऊन राहणे म्हणजे उपवास नव्हे.ग्रीष्म ऋतूची या दिवसांत सुरुवात होते. या काळात लंघन करणं आवश्यक असते. याकरिता फलाहार करणे उत्तम मानले जाते. लोकपरंपरेत न अडकता मनातल्या भावनेला न्याय देऊन जर कोणतीही क्रतवैकल्ये केली तर त्याचा फायदा होईल.

उपवासात काय खावे ?

गृहिणी आणि कामावर जाणाऱ्या स्त्रीयांनी स्वतःच्या आरोग्याला सोसेल असाच उपवास किंवा लंघन करावे. भुकेले राहिल्याने उपवास होत नाही. वटपौर्णिमा पावसाळ्यात येते. या ऋतुमध्ये शरीरातील पित्त आणि कफाचे प्रमाण वाढलेले असते ते नियंत्रणात आणण्यासाठी क्रत केले जाते. याकरिता जे पचनसंस्थेला आराम देतील असे पदार्थ खावेत. अशा वेळी डाळिंब, अंजीर, ओले खजूर, काळे मनुके, राजगिरा लाडू, मुगाची डाळ, वरीच्या भाजलेल्या तांदळाची पेज, भोपळ्याचं रायतं असा आहार घेता येईल.

काय खाऊ नये ?

बटाटा, रताळा, साबुदाण्याची खिचडी, वेफर्स, चहा, वनस्पती तूप असे पिष्टमय पदार्थ शिवाय पॅकबंद, तळलेले पदार्थ उपवासाच्या दिवशी खाऊ नयेत.