काय सॉलिड उकडतंय यार! राज्यात विजेची रेकॉर्डब्रेक 28425 मेगावॅटची मागणी, एसी, पंखे ऑन डय़ुटी 24 तास

राज्यातील तापमानाचा पारा 42 अंशांच्या वर गेला असून उकाडाही कमालीचा वाढल्याने एसी, पंखे, कुलर, सुसाट धावू लागले आहेत. त्यामुळे आज राज्यात आतापर्यंतची रेकॉर्डब्रेक 28 हजार 425 मेगावॅट विजेची मागणी नोंदली आहे. यामध्ये राज्यभरातून महावितरणकडे 25 हजार 3 मेगावॅट एवढी मागणी नोंदली असून मुंबईची विजेची मागणी 3 हजार 422 मेगावॅट एवढी आहे.

 राज्यभरातील सुमारे 2 कोटी 60 लाख वीज ग्राहकांना महावितरणकडून वीज पुरवली जाते, तर मुंबई शहर आणि उपनगरातील सुमारे 40 लाख ग्राहकांना बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटीकडून वीज पुरवठा केला जातो. गेल्या पंधरा दिवसांपासून विजेच्या मागणीत मोठी वाढ नोंदली जात आहे.

आज महावितरणकडे 25 हजार 3 मेगावॅट एवढी मोठी मागणी नोंदली असून 24 हजार 400 मेगावॅट एवढय़ा विजेचा पुरवठा केला आहे.

महावितरणने महानिर्मितीकडून 9 हजार 350 मेगावॅट वीज घेतली असून खासगी वीज प्रकल्पातून 8453 मेगावॅट, तर पेंद्रीय वीज प्रकल्पातून सुमारे 7 हजार 200 मेगावॅट एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वीज घेतली आहे.

मुंबईत टाटा पॉवरच्या वीज प्रकल्पातून 934 मेगावॅट, अदानीच्या औष्णिक वीज प्रकल्पातून 486 मेगावॅट तर पॉवर एक्सचेंजमधून 2000 मेगावॅट वीज घेतली आहे.

कोयना वीज प्रकल्पातून 1830 मेगावॅट वीजनिर्मिती

महानिर्मितीच्या कोयना जलविद्युत प्रकल्पाची एकूण वीजनिर्मिती क्षमता 1960 मेगावॅट एवढी आहे. तसेच सध्या धरणात वीज निर्मितीसाठीचे 11 टीमएसी एवढा मोठा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापार्श्वभूमीवर विजेची मागणी वाढल्याने सातत्याने येथून दीड हजार मेगावॅटची वीजनिर्मिती केली जात आहे. त्यातच आज राज्यभरातून विजेची विक्रमी मागणी नोंदल्याने येथून 1830 मेगावॅट म्हणजे क्षमतेच्या जवळपास 92-93 टक्के एवढी वीजनिर्मिती सुरू आहे.