मुंबईचे पुढचे तीन दिवस ‘सैराट’ पावसाचे

सामना ऑनलाईन । मुंबई

उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिलेला असला तरी पुढचे तीन दिवस मात्र मुंबईत सैराट पाऊस कोसळणार आहे. ८,९, १० जूनला मुंबईत धुवांधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. तसेच संततधार पावसामुळे मुंबईची रेल्वेसेवाही कोलमडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहनही हवामान खात्याने केले आहे.

यावर्षी पाऊस समाधानकारक असेल असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला होता. पण आता मान्सूनच्या सुरुवातीलाच मुंबईकरांना पाऊस झोडपून काढेल असे स्कायमेटने सांगितले आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या पहिल्याच धडकेने मुंबईकरांची दाणादाण उडवली होती. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूककोंडीही झाली होती. पावसाचा फटका मध्य व हार्बर रेल्वेलाही बसला होता.

पण येत्या तीन दिवसात कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांची पुन्हा एकदा दाणादाण उडणार आहे. ६ जूनला पावसाच्या हलक्या सरी पडतील. तर ८ ते १० जूनला मुसळधार पाऊस कोसळणार आहे, अशी माहिती स्कायमेटचे सीईओ जतीन सिंह यांनी ट्विटरवरून दिली आहे.