अंबरनाथ-बदलापूरमध्ये वीज-पावसाचा खेळ सुरूच

सामना प्रतिनिधी । अंबरनाथ

परतीच्या पावसाने ठाणे जिल्ह्यात जोर धरला असून अंबरनाथ-बदलापूर-कल्याण परिसरात गेले तीन दिवस पाऊस बरसत आहे. वीजेचा लखलखाट, ढगांचा गडगडाट आणि सुरू असलेला पाऊस असेच चित्र तीन दिवस पाहायला मिळत असले तरी वातावरणात मात्र उकाडा काही कमी झालेला नाही.

गणपती उत्सवात सर्व दिवस तुफान कोसळल्यानंतर पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. यानंतर प्रचंड उकडा जाणवत होता. मात्र सोमवारी संध्याकाळी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवार-बुधवारी रात्रीही जोरदार पाऊस झाला. गुरुवारी सकाळी पाऊस शांत झाला मात्र रात्री पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आणि शुक्रवारी पहाटे पावसाने चांगलाच जोर धरल्याचे पाहायला मिळाले.