येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज

सामना ऑनलाईन, मुंबई

गेल्या आठवडाभर सुरू असलेली दिवाळीची धामधूम आता संपली आहे. चार ते पाच दिवसांच्या सलग सुट्टय़ांमध्ये फराळावर ताव मारून झालाय. आजपासून बँका आणि सरकारी कार्यालये पुन्हा उघडतील. तशीच पावसाचीही सुट्टी संपली असून तोही कामावर परतणार आहे. येत्या २४ तासांत मुंबईसह राज्यात काही ठिकाणी सायंकाळनंतर ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दिवाळीच्या आधी पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवाळीतही तो फटाके फोडणार असल्याचा अंदाज होता. परंतु पावसानेही रजा घेतली आणि मुंबईकरांना दिवाळी उत्साहात साजरी करता आली. दरम्यान, रविवारी पारा १ ते २ डिग्री सेल्सियसने घसरला असून सांताक्रुझमध्ये ३३ डिग्री सेल्सियस तर कुलाब्यात ३२.७ डिग्री सेल्सियस इतके तापमान होते.

मान्सून तीन दिवसांत देशातून परतणार
देशासाठी वरदान ठरलेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) यंदाच्या हंगामात समाधानकारक पाऊस दिला. मान्सूनचा देशातील मुक्काम आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या ४८तासांमध्ये महाराष्ट्रासह आणखी काही भागांतून मान्सून माघारी फिरणार असून पुढील तीन दिवसांत संपूर्ण देशभरातून मान्सून परतणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

यंदाच्या हंगामात १४ मे रोजी अंदामानात दाखल झालेला मान्सून ३० जून रोजी केरळात तर १० जून रोजी दक्षिण महाराष्ट्रात पोहचला. २४ जून रोजी मान्सूनने राज्य व्यापले तर १९ जुलै रोजी मान्सून वारे देशात सर्वदूर पोहचले. २७ जुलै रोजी वाऱ्यांनी देशातून परतीचा प्रवास सुरू केला. १५ ऑक्टोबर रोजी राज्याच्या उत्तर भागातून तर २० ऑक्टोबर रोजी संपूर्ण विदर्भासह राज्याच्या बहुतांशी भागांतून मान्सूनने काढता पाय घेतला. ईशान्य हिंदुस्थानातून मान्सून माघारी फिरला असून महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून मान्सून परतण्यास पोषक स्थिती आहे.

हिवाळा लांबणीवर पडणार?
पावसाळा संपला असून आता लोकांना प्रतीक्षा आहे ती हिवाळ्याची. परंतु वाऱयाची दिशा नैऋत्य-ईशान्य अशीच असल्यामुळे आणि उत्तरेकडून गार वारेही वाहत नसल्यामुळे हिवाळा आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पावसाचे उशिरा आगमन झाले असून त्याचा परतीचा प्रवासही उशिरा झाला. त्यामुळे हिवाळाही उशिराच सुरू होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

भाऊबीजेला बरसणार होता
शनिवारी राज्यभरात भाऊबीज उत्साहात साजरी झाली. परंतु शनिवारी अनेक भागांत ढगाळ वातावरण होते. त्यामुळे ऐन भाऊबीजेला बरसून पाऊस वाट तर लावणार नाही ना, असे भाऊ-बहिणींच्या मनात चमकून गेले.

– नैऋत्य मान्सून ईशान्येकडील राज्य तसेच आंध्र प्रदेशचा काही भाग, तेलंगणा आणि महाराष्ट्र तसेच गोव्यातून माघार घेण्याच्या दृष्टीने २४ ऑक्टोबरपासून पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल असे हवामान विभागाने म्हटले आहे.

– मान्सूनदरम्यान देशभरात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडला. परतीचा प्रवास लांबल्याने सप्टेंबर महिन्यातही मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात मुसळधार वादळी पाऊस पडला.

– विदर्भात पावसाने ऑक्टोबर महिन्यात हजेरी लावली.

– ऑक्टोबरमध्ये २१ तारखेपर्यंत देशभरात सरासरीच्या ११० टक्के पाऊस तर राज्यात सरासरीपेक्षा ५४ टक्के अधिक पाऊस पडला.

बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाचा परिणाम अजूनही महाराष्ट्रावर आहे. याशिवाय आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र कर्नाटकच्या दिशेला तयार झाले असल्याने परतीचा पाऊस अजूनही कोसळत आहे.
के. श्रीवास्तव (वरिष्ठ वैज्ञानिक, हवामान विभाग)