देवगडमध्ये संततधार कायम, दोन घरांवर झाड कोसळले

2

सामना प्रतिनिधी, देवगड

तालुक्यात गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः देवगडला झोडपून काढले. धुवांधार कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूककोंडी झाली होती. तसेच पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून दोन घरावर झाड कोसळल्याने यांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर तालुक्यातील काही गावांमधील दूरध्वनी सेवा व विद्युत पुरवठा खंडित होत होता.

मंगळवारी दुपारी मुसळधार पावसाने सुरुवात केल्याने दुसऱ्या दिवशीही बुधवारी पावसाचा जोर कायम होता. तसेच आरे चव्हाणवाडी येथील सीताराम राघो चव्हाण यांच्या घरावर झाड पडल्याने सुमारे ५० हजारांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच सरपंच महेश पाटोळे, पोलिस पाटील राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच सांडवे येथील रामचंद्र आप्पा मसुरकर यांच्या घरावर झाडाची फांदी पडून सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात एकूण सुमारे ११० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

सिंधुदु्र्ग जिल्ह्यातील तालुकानिहाय पावसाचे प्रमाण
दोडामार्ग    ४७ (९२७),
सावंतवाडी    ६६(८८६) मि.मी.,
वेंगूर्ला    २७.४ (८२५.८७) मि.मी.,
कुडाळ    २८ (७१५) मि.मी.,
मालवण   १६ (६७५) मि.मी.,
कणकवली   ६५ (९१३) मि.मी.,
देवगड    ११० (५५३) मि.मी.,
वैभववाडी    ८८ (६७३) मि.मी.
एकूण पाऊस   ४४७.४ (६३६८.२७) मि.मी. पडला असून ५५.९२ (७९६.०३) मि.मी. इतकी सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे.