हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीचे थैमान; भूस्खलनामुळे 41 जणांचा मृत्यू

उत्तर हिंदुस्थानातील उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात संततधार पाऊस आणि भूस्खलन जीवघेणे ठरत आहे. हिमाचल प्रदेशात भूस्खलनामुळे आत्तापर्यंत सुमारे 41 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर एका मंदिराच्या ढिगाऱ्याखाली 9 जण गाडले गेले आहेत. उत्तराखंडमध्ये देखील भूस्खलन आणि पावसाचा विध्वंस पाहायला मिळत आहे.

हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मागील 24 तासांपासून सतत पाऊस पडत आहे. सोलनमध्ये ढगफुटीमुळे दोन घरे वाहून गेली. या घटनेत सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर सहा जणांना वाचवण्यात यश आले आहे. सोलनचे पोलिस अधिक्षक गौरव सिंह यांनी सात मृतांची नावे घोषित केली आहेत. दुर्घटनेत मृत पावलेल्यांची हरनाम (38), कमल किशोर (35), हेमलता (34), राहुल (14), गोलू (8), आणि रक्षा (12) अशी नावे आहेत.

हिमाचल प्रदेशातील बलेरा परिसरात भूस्खलानामुळे घरं कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहे. अशाच एका घटनेत दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एका मुलाचा मृतदेह सापडला आहे. त्याचवेळी रामशहर भागातील बनाल गावात भूस्खलनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. मंडी जिल्ह्यातील सेघली भागात रविवारी रात्री झालेल्या भूस्खलनात एका दोन वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. गृहमंत्री अमित शहा यांनी हिमाचल प्रदेशात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.

संततधार पावसामुळे हिमाचल प्रदेशमधील सरकारने विद्यापीठात होणारे वर्ग व परिक्षा रद्द केल्या आहेत. अधिसूचना जारी करत 14 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद राहणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेत मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांनी हा निर्णय घेतला आहे.