केरळमधील अतिवृष्टीने आठ हजार कोटींचे नुकसान; 10 हजार किलोमीटरचे रस्ते उद्ध्वस्त

सामना ऑनलाईन । तिरुवनंतपूरम

केरळमध्ये पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ८ हजार ३१६ कोटींच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तर १० हजार किलोमीटरचे रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून सोमवारी देण्यात आली आहे. केरळमध्ये विविध भागात १५ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवानान खात्याने वर्तवला आहे. तर हिमाचल प्रदेश, जम्मू कश्मीर आणि उत्तराखंड या राज्यातही अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी भूस्खलन झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर सुरक्षेसाठी जम्मू- श्रीनगर महामार्ग बंद करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे सात राज्यात आतापर्यंत ७७१ जणांचा बळी गेला आहे. केरळमध्ये सर्वाधिक १८७ जणांचा मृत्यू झाला असून उत्तर प्रदेशात १७१ जण मृत्यूमुखी पडले आहेत.

केरळमध्ये अतिवृष्टीने २० हजार घरांचे नुकसान झाले आहे. तर १८६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात भूस्खलनाच्या २११ घटना घडल्या आहेत. अतिवृष्टीमुळे सुमारे ६० हजार लोकांनी बचाव छावणीत आश्रय घेतला आहे. राज्यातील २७ धरणात अतिरिक्त पाणीसाठी झाल्याने त्यांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रशासनाने पूर्वसूचनेशिवाय धरणाचे दरवाजे उघडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अचानक धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने सखल भागात पाणी साचले आहे. तसेच पूराचे पाणी वाढले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केरळची हवाई पाहणी केली होती. तसेच राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देऊन १०० कोटींचे पॅकेजही जाहीर केले होते. या नैसर्गिक आपत्तीत ज्यांच्या पासपोर्टचे नुकसान झाले आहेत, त्यांचे पासपोर्ट निःशुल्क बदलून देण्यात येतील अशी घोषणा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केली आहे.

हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे गेल्या २४ तासांत पाचजणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे अनेकजण अडकले आहेत. अतिवृष्टीमुळे पार्वती नदीचा जलस्तर वाढल्याने मंडी जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. भूस्खलनाच्या घटनांमुळे किनौर, सिमला, चंबा,मनाली, कुलू आणि सिरमौर या जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे. हा संपर्क पुन्हा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अतिवृष्टीने जम्मू-कश्मीरच्या उधमपूरजवळ खेरीमध्ये भूस्खलन झाल्याने जम्मू- श्रीनगर महामार्ग बंद करण्यात आला आहे. उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये पावासची संततधार सुरू आहे. त्यामुळे शाळा- महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच देहरादून -मसूरी मार्ग बंद करण्यात आला आहे. चंपावत, उदयसिंहनगर, ऋषीकेष, रुद्रप्रयागमध्ये पूरपरिस्थितीने भीषण रुप धारण केले आहे. भूस्खलनामुळे रुद्रप्रयागमध्ये वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. बद्रीनाथमधील राष्ट्रीय महामार्गावर पावसाने मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने वाहतूक थांबवण्यात आली आहे.