कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात; धरणाच्या पाण्यात मोठी वाढ

हवामान खात्याने तीन दिवस जिह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ दिला असून, सर्वत्र दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. दोन आठवडय़ांपूर्वी तळ गाठलेल्या जिह्यातील धरणांत सध्या 25 ते 40 टक्के पाणीसाठा झाला असला, तरी घटप्रभा वगळता, इतर धरणांतून विसर्ग बंद आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पंचगंगा नदीवरील राजाराम व शिंगणापूर असे दोन बंधारे यंदा प्रथमच आज सकाळी पाण्याखाली गेले. दरम्यान, राधानगरी धरण 31 टक्के भरले आहे.

जिह्यातील राधानगरी, दूधगंगा (काळम्मावाडी), वारणा आदी लहान-मोठय़ा अशा एकूण 15 व 91.81 टीएमसी क्षमतेच्या धरण प्रकल्पांत सध्या 56.01 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. राधानगरी धरणाची पाणीसाठा क्षमता 8.361 टीएमसी आहे. सध्या 2.62 टीएमसी म्हणजेच 31.31 टक्के पाणीसाठा झाला आहे.

 शिंगणापूर बंधारा पाण्याखाली जाण्यास पाटबंधारे जबाबदार

 1994 साली शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे 43 कोटी रुपये खर्चून शिंगणापूर पाणी योजना सुरू करण्यात आली. यावेळी शिंगणापूर पंचगंगा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला; पण हा बंधारा बांधल्यापासून आजपर्यंत या बंधाऱयाचे बरगे संबंधित विभागाकडून पावसाळ्या अगोदर कधीही वेळेत काढण्यात येत नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे एक-दोन दिवस पावसाचा जोर वाढला की, हा बंधारा पूर्ण पाण्याखाली जातो. या वर्षीही पाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षामुळे पाऊस सुरू असूनही बंधाऱयाचे बरगे काढण्यात आले नसल्याने सध्या शिंगणापूर बंधाऱयावरून पाणी वाहू लागल्याने या भागातील शेतीला याचा मोठा फटका बसत आहे. या मार्गावरून बऱयाचदा दिवसा आणि रात्रीही धोकादायक स्थितीत वाहतूक सुरू असतानाही प्रशासनाकडून वाहतूक बंद व्हावी, यासाठी फलक वा बॅरिकेड्स लावले नसल्याचे चित्र आहे. पाण्याची कल्पना जिल्हा आपतिव्यवस्थापन विभागालादेखील नसल्याने जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने बंधाऱयाचे बरगे काढावेत आणि योग्य वेळीच ते घालावेत, अशी मागणी शेतकरी आणि परिसरातील गावांतून होत आहे.