मुंबई कोलमडली; आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने धुडगूस घातला असताना मुंबईलाही आज चांगलेच झोडपून काढले. यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूकही मंदावली. यातच उद्या 20 जुलै रोजीदेखील अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. जोरदार पावसादरम्यान ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे पालिकेने आपली संपूर्ण आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून नागरिकांना खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत गेल्या आठवडाभरापासून पावसाचा जोर वाढला आहे. आजही हीच स्थिती राहिल्याने मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले. रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावल्याने कामावर जाणाऱयांची रखडपट्टी झाली. पावसाचा जोर इतका होता की मुंबई शहर विभागात 8, पश्चिम उपनगरात 15 आणि पूर्व उपनगरात 4 अशा एकूण 27 ठिकाणी झाडे-फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या. तर संपूर्ण मुंबईत दोन ठिकाणी घर-भिंत कोसळणे आणि तीन ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याच्या घटना घडल्या.

मालाडच्या कुरार येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आदिवासी पाडय़ाजवळील पायरी येथे ओढा क्रॉस करत असताना चंदन साहू हा युवक वाहून गेला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्याचे काम सुरू होते. भांडुप पश्चिम सोनापूर येथील झकारिया इमारतीतील दुसऱया मजल्याकरील प्लॅस्टर कोसळून तसीन शेख (5) या पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. पश्चिम रेल्वेच्या लोअर परेल वर्कशॉपमध्ये असलेल्या कॅण्टीनच्या छताचा स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात भगवान केदार हा कर्मचारी जखमी झाला आहे.

दहावी, बारावी फेर परीक्षा पुढे ढकलल्या

राज्यातील काही ठिकाणी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने 20 जुलै रोजी होणाऱया दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. दहावीचा पुढे ढकलण्यात आलेले पेपर 2 ऑगस्ट रोजी तर बारावीचा पुढे ढकलण्यात आलेला पेपर 11 ऑगस्ट रोजी होणार आहे, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले.

विद्यापीठ हुकलेल्या परीक्षा पुन्हा घेणार

मुसळधार पावसामुळे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. बुधवार 19 जुलै रोजी मुंबई विद्यापीठाअंतर्गत विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा पार पडल्या; पण पावसामुळे रायगड जिल्ह्यातील काही महाविद्यालयीन विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. अशा विद्यार्थ्यांची परीक्षा 22 जुलै रोजी त्याच परीक्षा केंद्रावर होणार आहे. बुधवारी सकाळपासूनच रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. अनेक भागांत पाणी साचल्याने रायगड जिल्हाधिकाऱयांनी येथील सर्व शाळा आणि कॉलेजना सुट्टी जाहीर केली.

मध्य रेल्वेवर रखडपट्टी!

मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यात आज पावसाने जबरदस्त धिंगाणा घातल्याने मध्य रेल्वे पुरती कोलमडली. अंबरनाथजवळ रुळावर सुमारे पाऊण फूट पाणी भरल्याने मध्य रेल्वेची अंबरनाथ-बदलापूर दरम्यानची लोकल सेवा ठप्प सकाळी आकरा वाजल्यापासून तब्बल सात तास ठप्प होती. त्यामुळे मध्य रेल्वेवर दिवसभरात तब्बल 80 हून अधिक लोकल गाडय़ा आणि लांब पल्ल्याच्या 10 एक्सप्रेस गाडय़ा रद्द करण्याची नामुष्की ओढावली होती. पावसाचा हार्बर मार्गावरील लोकल सेवेलाही फटका बसला असून दुपारपर्यंत 20 लोकल रद्द कराव्या लागल्या. दिवसभर लोकल सेवा खेळखंडोबा झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अनेक स्थानकांमध्ये प्रवासी अडकून पडले होते.

या एक्सप्रेस गाडय़ा रद्द

मध्य रेल्वेने पावसामुळे पुण्याहून येणाऱया आणि जाणाऱया लांब पल्ल्याच्या दहा गाडय़ा रद्द केल्या आहेत. त्यामध्ये पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी एक्सप्रेस, पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्सप्रेस, पुणे-सीएसएमटी इंद्रायणी एक्सप्रेस, सीएसएमटी-पुणे एक्सप्रेस, सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्सप्रेस या गाडय़ा आज रद्द करण्यात आल्या आहेत. तर कोल्हापूर-सीएसएमटी एक्सप्रेस पुण्यापर्यंत चालवण्यात आली असून सीएसएमटी-गडग एक्सप्रेस ही गाडी पुण्यातून सोडण्यात आली.

आज दिवसभर सुरू असलेल्या जोरदार पावसाचा विमान वाहतुकीला फटका बसला. दृश्यमानता कमी असल्याने मुंबई विमानतळावरून 20-25 मिनिटे विलंबाने विमाने उड्डाण करत होती. त्यामुळे लँडिंगसाठी येणाऱया विमानांना बराच वेळ आकाशातच घिरटय़ा घालाव्या लागत होत्या. त्याचा विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला.

कोस्टल रोडच्या कामामुळेच वरळी सी फेस परिसरात पाणी भरले – आदित्य ठाकरे

वरळी सी फेस परिसरात आज पाणी भरल्याची घटना घडली आहे. त्याला येथे सुरू असलेले कोस्टल रोडचे काम आणि महापालिकेचा नियोजनशून्य कारभार जबाबदार आहे. पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने कोणतेच ठोस नियोजन केले नसल्याचे यावरून दिसत आहे, असे ट्विट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे. तसेच पाणी भरल्याच्या घटनेची महापलिकेने आणि जी दक्षिण वॉर्ड ऑफिसने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.