पूर्व उपनगराला पावसाने झोडपले

सामना प्रतिनिधी । मुंबई

मोठ्य़ा विश्रांतीनंतर पुन्हा आलेल्या पावसाने आज दिवसभर शहर आणि उपनगरात चांगलीच बरसात केली. त्यातही पावसाने पूर्व उपनगराला चांगलेच झोडपले. आज सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत शहरात आज पाऊस पडला. शहर भागात १३.९४ मिमी, पूर्व उपनगरात ७७.०१ मिमी तर पश्चिम उपनगरात २०.८१ मिमी पाऊस पडला. येत्या २४ तासांत शहर आणि उपनगरात पावसाच्या हलक्या व तुरळक सरी पडतील असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे.

पाण्याची चिंता मिटली
अर्ध्या अधिक राज्यभरात पावसाने पाठ फिरवलेली असली आणि मुंबईतही पावसाची टक्केवारी कमी असली तरी मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची भ्रांत मिटली आहे. आतापर्यंत मुंबईत सरासरीच्या फक्त ५५.८९ टक्के पाऊस पडला आहे. तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत चांगलाच पाणीसाठा जमा झाला आहे. सातही तलावांत मिळून १३ लाख ३४,७५९ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

मुलुंड-घाटकोपरमध्ये सर्वाधिक पाऊस
पालिकेने शहर आणि उपनगरात विविध ६० ठिकाणी स्थापन केलेल्या पर्जन्यमापक यंत्रांवर दुपारी चार वाजेपर्यंत झालेल्या पावसाच्या नोंदीमध्ये सर्वाधिक पाऊस मुलुंड, भांडुप, विक्रोळी, गव्हाणपाडा, घाटकोपर इथे पडला आहे. गव्हाणपाडा आणि घाटकोपर येथे सर्वाधिक १०८ मिमी, त्याखालोखाल एस वॉर्ड भांडुपमध्ये १०२ मिमी पाऊस पडला तर विक्रोळीत ८४ मिमी पावसाची नोंद झाली.

रविवारी सकाळी मोठी भरती
दरम्यान, रविवार, २० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी समुद्राला भरती येणार असून यावेळी साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. भरती असतानाच पावसाचा जोर असल्यास मुंबईकरांनी आणि समुद्रावर फिरायला जाणाऱ्या पर्यटकांनी सावध राहावे असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.