नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला

नांदेड जिल्ह्यात २० जुलै दुपारपासून ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अतिवृष्टी होऊन पावसाचा हाहाकार उडाला असून अनेक नाल्यांना पुर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. विष्णुपुरी प्रकल्पात पाणी पातळी वाढल्याने गुरुवारी रात्री विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर जिल्हाभरातील शाळांना प्रशासनाने शुक्रवारी २१ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे.तसेच गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नांदेड शहरातही २० जुलै च्या सायंकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

महानगरपालिकेकडून मान्सूनपूर्व नालेसफाई न झाल्याने शहरातील अनेक भागातील नाली व गटाराचे पाणी रस्त्यावर आल्याने महानगरपालिकेचे पितळ उघडे पडले आहे.हिंगोली गेट भागातील पुला खाली पाणी साचले असून हा रस्ता बंद झाला आहे.जिल्ह्यातील अनेक भागात राष्ट्रीय व राज्य महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने ढगफुटी सदृश्य पावसाने या रस्त्यावर चिखल झाल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गुत्तेदाराचा निष्काळजीपणा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार यामुळे नागरिकात संताप व्यक्त होत आहे.

जिल्हाभरात दोन ते तीन दिवसापासून रिमझिम पावसाच्या हजेरीनंतर २० जुलै रोजी दुपारच्या सुमारास जिल्ह्यातील धर्माबाद,देगलूर,बिलोली,नायगाव मुखेड, हदगाव,हिमायतनगर,किनवट या भागात ढगफुटी सदृश्य पावसाने हजेरी लावल्याने अनेक ओहोळ, नाल्यांना पूर आला आहे.जिल्ह्यातील अनेक भागात शेतातील पिके खरडून जाऊन शेताचे तळ्यात रूपांतर झाले आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. यामुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.बिलोली तालुक्यातील मांजरा नदीच्या जुन्या पुलावरून पाणी वाहत असल्याने बिलोली ते बोधन रस्ता बंद करण्यात आला आहे.तसेच बिलोली तालुक्यातील हरणाळी माचनुर,बोळेगाव,आरळी,कासराळी,बेळकोणी, कुंडलवाडी व गंजगाव या भागातील जवळपास १००० लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी ते आरळी,कुंडलवाडी ते हरनाळी,नागणी-माचनूर-गंजगाव,कुंडलवाडी ते गंजगाव गावांचा संपर्क तुटला आहे,गंजगाव ते कार्ला फाटा दरम्यान असलेल्या नाल्याला पूर आल्याने ५ लोक पुरामध्ये अडकले होते.उपविभागीय अधिकारी सचिन गिरी,उपविभागीय पोलीस अधिकारी कसेकर, तहसीलदार श्रीकांत निळे,नायब तहसीलदार रघुनाथसिंह चौहाण यांच्यासह महसूल व पोलीस प्रशासनाने गुरुवारी रात्री मध्यरात्री २ वाजेपर्यंत मदत करून ५ लोकांना पुरातून सुरक्षित रित्या बाहेर काढले. सावळी रोडवर असलेल्या नाल्याला पूर आल्याने शहरातील लिटल फ्लाँवर कॉन्व्हेंट स्कूलच्या ६०० विद्यार्थ्यांना जेसीबीने पुरातून आणण्यात आले.धर्माबाद तालुक्यातील सिरसखोड पूल पाण्याखाली गेल्याने बामणी,इळेगाव मनुर व संगम गावांचा संपर्क तुटला आहे.बन्नाळी गावात पावसाचे पाणी घरात शिरल्याने संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले असून दीडशे लोकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले.

हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली गावच्या नाल्याला पूर आल्याने या गावचा संपर्क तुटला असून सुना तलाव ओसंडून वाहत आहे. नरसी ते देगलूर रोडवर टाकळी येथे रोडवर पाण्याचा प्रवाह वाढल्याने आंध्र प्रदेशातील चार व्यक्ती पुरात अडकले होते.त्यांना रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी संकेत दिघे व पोलीस कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले आहे.मुखेड तालुक्यातील पाळा व कोळनूर,होनवडज या गावातही पावसाने पावसाचे पाणी घरात शिरल्याने तेथील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी प्रशासनाकडून हलवण्यात आले आहे. किनवट ते बोधडी रस्ता बंद झाल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

प्रशासन सतर्क

हवामान खात्याने दिलेल्या इशारा नंतर बिलोली तालुक्यात २० जुलै च्या दुपारपासून ढगफुटी सदृश्य पावसाने हाकार माजवला यातच बिलोली तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.पुरात अडकलेल्या लोकांना प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून प्रशासन पूर्णतः सतर्क असल्याचे बिलोलीचे तहसीलदार श्रीकांत निळे यांनी सांगितले आहे.