मुंबईत पावसाची धो – धो हजेरी, चार दिवसांसाठी ‘यलो ऍलर्ट’

यंदा लवकर दाखल होऊन नंतर अनेक दिवस ओढ दिलेल्या पावसाने जून सरत असतानाच गुरुवारी मुंबईत धो-धो हजेरी लावली आणि संपूर्ण महिनाभराची कसर भरून काढली. दिवसभर अविश्रांत बरसात सुरू ठेवल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. रस्ते वाहतुकीचा ठिकठिकाणी खोळंबा झाला, तर लोकलचे वेळापत्रक कोलमडले. नवी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. पुढील चार दिवसांत पावसाचा जोर आणखीन वाढेल, असा इशारा देत हवामान खात्याने ‘यलो अॅलर्ट’ जारी केला आहे.

कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी, मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढला आहे. कुलाबा वेधशाळेने बुधवारी याबाबत अंदाज वर्तवला होता. तो अंदाज खरा ठरवत पावसाने गुरुवारी संपूर्ण दिवसभर मुंबई शहर, उपनगरांसह परिसरात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गासह इतर रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसला आणि मुंबईकरांचा ठिकठिकाणी गाडय़ांमध्येच खोळंबा झाला. काही सखल भागांत अनेक घरे आणि दुकानांमध्येही पाणी घुसले. यात अनेकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. धो-धो पाऊस सुरूच राहिल्यामुळे पाणी ओसरण्यास वेळ लागला. परिणामी, रहिवाशांचे प्रचंड हाल झाले. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, रायगड व वसई-विरार परिसरालाही मुसळधार पावसाने झोडपले आहे. रेल्वे रुळांवरही पाणी साचल्यामुळे लोकल गाडय़ांचा वेग मंदावला. सायंकाळी पावसाचा जोर वाढल्याने नोकरदारांची कुठे रस्ते, तर कुठे रेल्वे स्थानकांत रखडपट्टी झाली. कोकण किनारपट्टीसह उर्वरित राज्यात पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गुरुवारी सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सांताक्रुझमध्ये 125.6 मिमि, तर कुलाब्यात 52.4 मिमी पावसाची नोंद झाली. शहर व उपनगरांत अनेक ठिकाणी झाडे कोसळली. तसेच काही घरांचीही पडझड झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मुसळधार पाऊस सुरू राहिल्याने दादर-हिंदमाता, अंधेरी सब वे आदी अनेक परिसरांत पाणी भरले. अंधेरी सब वेमधील वाहतूक बंद ठेवण्यात आली असून येथील वाहतूक पर्यायी गोखले रोडवरून वळवली आहे. हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार-पाच दिवस मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल.