राज्यात आगामी 24 तासात मुसळधार कोसळणार! मुंबई-पुण्याला रेड अलर्ट जारी

गेल्या चार दिवसापासून मुंबईसह राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात आगामी चार दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने बुधवारी वर्तवला होता. तसेच मुंबई शहर आणि उपनगराला रेड अलर्ट देण्यात आला होता. बुधवार रात्रईपासून मुंबईत जोरदार पाऊस बसरत आहे. त्यामुळे हवामान खात्याने मुंबईला शुक्रवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर मुंबईसह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे. पुढील 24 तासांत राज्यात मुसळधार पाऊस होईल, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

हवामान खात्याचे पुणे विभागाचे अध्यक्ष कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, मुंबई, ठाणे, रायगड, पुणे-साताऱ्यातील घाट परिसर, कोल्हापूरचा काही भाग, हिंगोली, यवतमाळ, परभणी आणि लगतच्या भागात गुरुवारी संध्याकाळी मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने मुंबईला गुरुवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला होता. परंतु त्यानंतरही पावसाचा वेग कायम असल्याने हवामान खात्याने आता शुक्रवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबईसह, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, वसई-विरार भागात मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकल्याने पुढील 24 तासांत राज्यात मान्सून अतिसक्रिय असेल, तर त्यानंतरच्या 24 तासांत मान्सून सक्रिय असेल. कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट विभाग आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर पावसाचं प्रमाण कमी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.