कसारा घाटात आठ तास वाहतूक ठप्प, ओव्हरलोड ट्रक उलटला

सामना प्रतिनिधी, कसारा

मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटात पहाटे अडीचच्या सुमारास ओव्हरलोड ट्रक उलटल्याने सुमारे आठ तास वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला. त्यामुळे रात्री उशिरा कसारा घाटातून प्रवास करणाऱया वाहनचालक व प्रवाशांचे अतोनात हाल झाले. दरम्यान, अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागल्याने कसारा घाट हा डेंजर झोन बनू लागला आहे.

कसारा घाटातील एका वळणावर कापडाचे गठ्ठे घेऊन जाणारा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला. ट्रकमधील कपड्यांचे गठ्ठे अस्ताव्यस्तपणे रस्त्यावर पसरले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घाटामध्ये तब्बल पाच किलोमीटरपर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रात्रीच्या किर्रर्र अंधारात घडलेल्या या अपघातामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सकाळी ६ च्या सुमारास पीक इफ्रा कंपनीच्या गस्ती पथकाने क्रेनच्या सहाय्याने ट्रक हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रकचे वजन जास्त असल्यामुळे तो तिथेच पडून राहिला.

अपघातग्रस्त ट्रक हटविण्यासाठी अखेर सकाळी ११ च्या सुमारास महाकाय क्रेन आणण्यात आली. या क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला काढण्यात आला. दरम्यान सात ते आठ तास कसारा घाटामध्ये वाहतूककोंडीमुळे प्रवाशांनी तीक्र संताप व्यक्त केला. कसारा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रवीण कोल्हे हे स्वतः घटनास्थळी उपस्थित होते. लतिफवाडीपासून पर्यायी रस्त्याने वाहतूक वळविण्यात आली. मुंबई-नाशिक महामार्गावरील अपघात वाढू लागल्याने हा मार्ग धोक्याचा बनत चालला आहे.

पोलिसांनी पळविले कपड्यांचे बंडल
कसारा घाटात कपड्यांचे बंडल वाहून नेणारा ट्रक उलटल्याने मोठी वाहतूककोंडी झाली. ही घटना घडताच तातडीने मदतकार्य सुरू करण्याऐवजी हापापलेल्या काही पोलिसांनी रस्त्यावर पडलेले कपड्यांचे बंडल पोलीस व्हॅनमध्ये टाकून पळ काढला. हा प्रकार काही प्रवाशांनी बघितला असून पोलिसांच्या या कृतीमुळे संताप व्यक्त होत आहे.