कुलभूषण जाधव प्रकरण, आंतरराष्ट्रीय कोर्टात आजपासून सुनावणी

सामना ऑनलाईन। हेग

पाकिस्तानातील ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने पुलवामामध्ये केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या घटनेनंतर हिंदुस्थानचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या केससंदर्भात हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात हिंदुस्थान-पाकिस्तान प्रथमच आमनेसामने येणार आहेत. या केसची सुनावणी उद्या सोमवारपासून या जागतिक कोर्टात होणार असून ती 21 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

कुलभूषण जाधव हे सध्या पाकच्या तुरुंगात आहेत. पाकमध्ये घातपाती कृत्ये, दहशतवादी कारवाया कुलभूषण यांनी केल्या असा आरोप ठेवून पाकच्या लष्करी कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेस हिंदुस्थानने हेग कोर्टात आव्हान दिले. यानंतर या फाशीला हेग कोर्टाने स्थगिती दिलेली आहे. याच केसची ही सुनावणी उद्यापासून पुन्हा सुरू होणार आहे. या केसच्या सुनावणीसाठी पाकिस्तानी वकिलांचे एक पथक शुक्रवारीच हेगमध्ये दाखल झालेले आहे.

या प्रकरणात हे जागतिक कोर्ट जो निर्णय देईल तो आम्ही मान्य करू, असे पाकच्या एका अधिकाऱयाने सांगितलेले आहे. या कोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी करण्यास आम्ही बांधील आहोत, असे या अधिकाऱयाने स्पष्ट केले आहे.