सार्वत्रिक निवडणुकांसाठी हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध होणार

सामना ऑनलाईन, गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यात होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी वेगवेगळ्या मतदारसंघात निवडणूक साहित्य, निवडणूक कर्मचारी पोहोचविणे व त्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी पोलीस कर्मचारी पोहोचवणे यासाठी पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांना दिनांक 13 ते 23 फेब्रुवारी 2017 या कालावधीसाठी 2 मोठी हेलिकॉप्टर्स (MI-17) आणि 2 बाऊजर पुरविण्यात येणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय नुकताच गृह विभागाने प्रसिध्द केला आहे.

राज्य निवडणूक आयोगामार्फत राज्यात जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणूका घोषित करण्यात आल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यात दिनांक 16 व 21 फेब्रुवारी 2017 रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील काही परिसर अतिदुर्गम आहे. त्याचप्रमाणे, बहुतांश भाग उंच टेकड्या व जंगलव्याप्त असल्यामुळे त्या ठिकाणी वाहतुकीचे साधने अपुरी आहेत. या भागांमध्ये नक्षलवादी चळवळही सक्रिय आहे.

अशा परिस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणूका शांततेत पार पाडण्याकरीता पोलीस अधिक्षक यांना हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार असून ही हेलिकॉप्टर केंद्र शासनाकडून भाड्याने घेण्यात येणार आहेत.  या निर्णयामुळे जिल्ह्यातील निवडणूका शांततेत पार पाडण्यास मदत होणार आहे.