यापुढे ‘आयएसआय’ दर्जाच्या हेल्मेटचीच विक्री,अन्यथा विक्रेत्यांना दंड

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱया दुचाकीस्वारांची वाढती संख्या लक्षात घेऊन यापुढे केवळ आयएसआय दर्जाच्या हेल्मेटचीच विक्री करणे सक्तीचे करण्यात आले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत आयएसआय दर्जाशिवाय हेल्मेट विक्री करणे हा गुन्हा समजण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने हेल्मेटची निर्मिती करणाऱया सर्व कंपन्यांना ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड्सचे (बीआयएस) सुरक्षा नियमांसंदर्भातील प्रमाणपत्र मिळविणे सक्तीचे केले आहे. बीआयएसने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार रस्ते सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱया नियमांची अंमलबजावणी येत्या सहा महिन्यांत पूर्ण होणार आहे. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि धमेंद्र प्रधान हेदेखील उपस्थित होते.

जे वाहनचालक आयएसआय प्रमाणित हेल्मेट वापरणार नाहीत, त्यांच्याकडून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड आकारण्यात येणार आहे. बीआयएसच्या नियमाप्रमाणे विनाआयएसआय मार्कवाले हेल्मेट बेकायदा असून हे हेल्मेट वापरणाऱयांवर वाहतूक नियमांप्रमाणे कारवाई होणार आहे.