शिनजियांग : चीनसाठी ‘टाइमबॉम्ब’!

>>ब्रिगेडियर हेमंत महाजन<<

[email protected]

हान चायनीज लोक चीनमध्ये बहुसंख्येने असले तरी अन्य ५६ अल्पसंख्य समुदायांमध्ये तिबेटी, उईगूर, हुई मुस्लिम, मंचू व मंगोलियन्स प्रमुख आहेत. तिथे बंडाचे झेंडे फडकाविले गेले आहेत. ज्याप्रमाणे चीन हिंदुस्थानला पाकिस्तानबरोबर लढवत ठेवतो तसेच आता आपण चीनला त्यांच्या पश्चिमेच्या प्रांतात लढवत ठेवावे लागेल. शिनजियांग चीनमधला टाइमबॉम्ब आहे. तो कधी फुटेल याचा नेम नाही. जर चीन  हिंदुस्थानातील दहशतवाद, बांगलादेशी घुसखोरी, बंडखोरी आणि माओवादाला मदत करत असेल तर आपण पण शिनजियांगमधील स्वातंत्र चळवळीला मदत करायला हवी.

सध्या चीनमध्ये प्रशिक्षणाच्या नावाखाली मुस्लिमांवर निर्घृण अत्याचार होत असल्याच्या बातम्या बाहेर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चीनमध्ये मुस्लिम समाजाला प्रशिक्षित करण्याच्या हेतूने अनेक प्रशिक्षण केंद्रे चालू करण्यात आलेली आहेत. मात्र या प्रशिक्षण केंद्रांमधून बाहेर पडलेल्या काही लोकांनी आपल्याला आलेल्या अनुभवांची जी माहिती दिली आहे, ती अंगावर शहारे आणणारी आहे.

प्रशिक्षण केंद्रात राहून आलेल्या एका व्यक्तीने सांगितले, की त्यांचे विचार बदलण्यासाठी त्यांचा सतत छळ करण्यात येत होता. दररोज अनेक तास कम्युनिस्ट पक्षाचा प्रचार वाचण्याची त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात येत होती. सर्व मुस्लिमांना अध्यक्ष शी जिनपिंग यांना धन्यवाद देऊन त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी घोषणा करायला लावली जात होती. प्रशिक्षण केंद्राचे नियम न पाळणाऱ्या वा त्यांना विरोध करणाऱ्यांच्या हातापायात १२-१२ तास बेडय़ा घालण्यात येत होत्या.

तेथे अत्यंत हलक्या प्रतीचे भोजन देण्यात येत होते आणि चांगल्या अन्नाची मागणी केली तर जबरदस्तीने डुकराचे मांस खायला लावून दारू पिणे भाग पाडत होते. या दोन्ही गोष्टी मुस्लिम धर्मात निषिद्ध मानल्या जातात. केवळ मुस्लिम असल्याने आणि कझाकिखस्तानला जाऊन आल्याने आपल्याला अटक करून तीन दिवस जाबजबाब घेण्यात आले आणि नंतर तीन महिने शिनजियांगमधील प्रशिक्षण केंद्रात पाठवण्यात आल्याचे कयारत समरकंद याने सांगितल्याचे असे प्रसिद्ध झाले आहे.

चीनमधील प्रशिक्षण केंद्रांमध्ये हजारो मुस्लिमांना ठेवण्यात आल्याची माहिती युरोपियन स्कूल ऑफ कल्चर अँड थिऑलॉजी इन कॉर्नेटलचे आंद्रियन जेंज यांनी दिली आहे. शिनजियांग प्रांतातील मोठय़ा संख्येने मुस्लिमांना प्रशिक्षणाच्या नावाखाली अटकेत ठेवण्यात आले आहे.

तिबेट, शिनजियांग व तैवान येथील ‘स्वातंत्र्या’च्या चळवळी हा चीनच्या सुरक्षिततेला असलेला मोठा धोका आहे. चीनच्या ताब्यातील एकूण क्षेत्रफळाचा विचार करता तिबेट, शिनजियांग देशाचा तीस टक्के भूभाग व्यापतात. हे प्रदेश नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न आहेत. अल्पसंख्याकांकडून चीनच्या सुरक्षेला असलेला धोका याविषयी सरकारकडे अनेक अहवाल आहेत. त्यामुळे संरक्षण खर्चात प्रचंड वाढ करण्यात आली आहे. सिकयांग पीपल्स आर्मड् पोलीस दलात ३० हजारांची भर घालण्यात आली आहे. दळणवळण सुविधा वाढवून सिकयांग प्रांतातील जास्तीत जास्त नैसर्गिक वायू व इंधनाचा उपयोग करण्याचे चीनचे धोरण आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे चीनच्या हानवंशीयांना या प्रदेशांमध्ये स्थायिक होण्यास प्रवृत्त केले जात आहे. उइगूरना त्यांच्याच प्रदेशात ‘अल्पसंख्य’ करण्याचा हा डाव आहे. तसे झाल्यास या भागातील उठावाची तीव्रता आपोआपच कमी होईल.

शिनजियांग प्रांतात मोठा हिंसाचार सुरू असून, यामध्ये शेकडो ठार झाले आहेत. पण नक्की आकडा चीन बाहेर येऊ देत नाही.  ‘ईस्ट तुर्कीस्तान इस्लामिक मूव्हमेंट’च्या पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवादी संघटनेने स्वतंत्र इस्लामी राज्याची मागणी केली आहे. पाकिस्तानव्याप्त कश्मीरला लागून असलेल्या चीनच्या सीमेवर शिनजियांग हा प्रांत, चीनचा सर्वांत संवेदनशील भाग मानला जातो. आठ देशांच्या सीमा या भागाशी जोडल्या गेल्या आहेत. या प्रांतात ४१ टक्के लोकसंख्या उईगूर समुदायाची असून ५० टक्के लोक हंन जमातीचे आहेत. स्वतंत्र राज्याची मागणी करीत गेल्या काही वर्षांपासून या भागात उईगूर मुस्लिम व पोलिसांमध्ये अनेक वेळा रक्तरंजित संघर्ष झाला आहे.

उईगूर जमातीचे लोक अमेरिका, युरोपमध्येही असून, त्यांचाही येथील चळवळीला पाठिंबा असतो. स्वातंत्र्यासाठीच्या सर्व चळवळी आतापर्यंत चीनने बळाचा वापर करीत मोडून काढल्या. मात्र शिनजिआंगमधील हिंसाचार आतापर्यंत शमवता आला नाही. मागच्या वर्षी  शिनजिआंग प्रांतात हिंसाचार घडविणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानातील दहशतवादी छावण्यांमध्ये प्रशिक्षण मिळाल्याचा आरोप चीनने केला. शिनजियांग प्रांतातील दहशतवादाबाबत चीनने पाकिस्तानवर दबावही टाकला, मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

पाकिस्तानच्या भूमीत चीन उभारत असलेला ४५०० कि.मी.हून अधिक रस्ता हा पाकिस्तानच्या विविध प्रांतांतून जाऊन चीनच्या शिनजियांग भागात प्रवेश करणार होता.

शिनजिआंग प्रांतातील अनेक दहशतवादी पाकिस्तानात दहशतवादाचे प्रशिक्षण घ्यायला येतात. हा रस्ता झाल्यास त्यांना येणे-जाणे फार सोपे पडणार आहे. यामुळे शिनजिआंग प्रांतातील दहशतवाद वाढण्याची शक्यता आहे.

चीनने रमजान महिन्यावर अनेक प्रतिबंध घातले आहेत. तेथील मुस्लिम मशिदीत जाऊ शकत नाही. पहाटे पाच वाजता पढली जाणारी नमाज आणि रमजानमध्ये रात्री पढली जाणारी तराबीहपासून ते वंचित राहतात. रोजे ठेवण्यावरही कडक प्रतिबंध केला आहे. चीन सरकार आपल्या कायद्याचे पालन जबरदस्तीने करवून तर घेतोच, तसेच जेव्हा एखाद्या धर्माच्या अनुयायांमुळे त्यांच्या सुरक्षेला बाधा येते असे त्यांना वाटले तर ते त्यांना प्रतिबंध घालण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. चीन चिनी मुस्लिमांशी दुर्व्यवहार करतो. चीन सरकारद्वारा घोषित केलेल्या या कडव्या प्रतिबंधाचे मुख्य कारण आहे, उईगूर मुस्लिम द्वेष. रशियाच्या विघटनातून उजबेकिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि खिरगीजस्तान आदी मुस्लिम प्रांत स्वतंत्र झाले त्याचाच शिनजियांग हा एक भाग होता. १९५५ पर्यंत तो स्वतंत्र होता. परंतु चीनने ज्याप्रमाणे आपल्या आसपासच्या सर्व देशांच्या सीमा किंवा प्रांत गिळंकृत केले त्याचप्रमाणे त्यांनी शिनजियांगवरही कब्जा केला.

चीनने शिनजियांगमधील अनेक मशिदी जमीनदोस्त केल्या असल्या तरी चिनी मुस्लिम गुप्त बैठका घेतात, मदरसे चालवतात. चिनी पोलीस आणि गुप्तहेरांची त्यांच्यावर बारकाईने नजर असते, पण चीन त्यांचे मनपरिवर्तन करू शकलेले नाही. चीनमध्ये राहून मुस्लिमांना दाढी आणि पडदा प्रथेचे पालन करता येत नाही. मुस्लिम मुलांना चिनी शाळेतच शिकावे लागते.  १९४० मध्ये हान जातीची संख्या या प्रांतात केवळ ५ टक्के होती. आज त्यांची लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे.