रावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा!

2

सामना ऑनलाईन । इंदूर

दुष्ट प्रवृत्तीचे प्रतीक मानून दसऱ्याला रावणाचे दहन करण्याची परंपरा आहे. मात्र, मध्य प्रदेशातील मंदसौर गावात दसऱ्याला रावणाचे दहन करण्यात येत नसून त्याचे पूजन करण्यात येते. मंदसौर गावाचा रावण जावई असल्याची मान्यता आहे. रावणाची बायको मंदोदरी हिचे हे माहेर आहे. या गावचे पूर्वीचे नाव दशपूर होते. या गावात रावणाची काही मंदिरे असून तेथे रावणाचे पूजन केले जाते. रावण हे दुष्ट प्रवृत्तीचे प्रतीक असण्याच्या मान्यतेला ग्रामस्थांचा विरोध आहे. रावण हा शिवभक्त आणि प्रकांड पंडित होता. दसरा हा रावणाचा मोक्षदिन म्हणून साजरा करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यंदाही तशीच पूजा करणार असल्याचे रावणाच्या भक्त असलेल्या इंदूरमधील लंकेश मित्र मंडळाचे अध्यक्ष महेश गौहर यांनी सांगितले. रावण हे आमचे आराध्य देवत असून आमच्या भावनांचा सन्मान करत इतरांनीही रावण दहन करू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

रावणाच्या मंदिरात दसऱ्याला विविध जातींचे सुमारे 900 लोक पूजेसाठी येतात. दरवर्षी त्यांच्या संख्येत वाढ होत आहे. रावणाबाबतच्या प्रचलीत कथांमधून फक्त त्याच्या विकृतीचे चित्रण करण्यात आले आहे. त्याच्यातील अनेक सद्गुण, कला आणि भक्ती त्यामुळे झाकोळली गेल्याचे रावणाच्या भक्तांचे म्हणणे आहे. दसऱ्याच्या दिवशी ढोल ताश्यांच्या गजरात रावणाची महापूजा आणि महाआरती करणार असल्याचे अखिल भारतीय अनुसूचित जाती युवजन समाजाचे महामंत्री शैलेंद्र खरे यांनी सांगितले.

मंदसौरमधील खानपुरामध्ये रावणाची पूजा करण्यात येते. येथे त्याचे मंदिर असलेल्या स्थानाला रावण उंडी म्हणतात. हे गाव दशपूर म्हणून प्रसिद्ध होते. रावणाच्या बायको मंदोदरीचे माहेर असल्या तिच्या नावावरून गावचे नाव मंदसौर झाले असावे असा कयास वर्तवण्यात येतो. त्यामुळे या गावाचा रावण हा जावई आहे. कोणीही आपल्या गावच्या जावयाचे दहन करणार नाही. त्यामुळे येथे रावण पूजनाची परंपरा आहे. विदिशा जिल्ह्यात रावणाचे दशानन मंदिर आहे. तेथे झोपलेल्या स्थितीतील रावणाची मुर्ती आहे. या ठिकाणी रावण बाबा म्हणून रावणाची पूजा केली जाते.