‘हे भगवान’ रंगणार रविवारी

मराठीतील ख्यातनाम लेखक पु. ल. देशपांडे यांच्या मूळ ‘विट्ठल तो आला आला’ या नाटकावरून बेतलेल्या ‘हे भगवान’ या हिंदी नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग येत्या रविवारी 16 सप्टेंबरला माटुंग्याच्या मैसूर असोसिएशन येथे रात्री 8 वाजता रंगणार आहे. यात्री प्रस्तुत या नाटकात समाजातील उच्चभ्रू सोसायटीतील लोकांच्या खोटय़ा भक्तिभावावर आसूड ओढण्यात आले आहेत. आपण आपल्या दिवसाची सुरुवात देवाच्या पूजेने करतो. देवाने आपली स्वप्ने पूर्ण करावीत अशी आपली इच्छा असते.  पण देव खरोखरच लोकांमध्ये आला तर काय धमाल उडेल? त्याचे चित्रण या नाटकात करण्यात आले आहे.  सर्वच जण त्या आलेल्या देवाकडे आपापली गाऱहाणी सांगतात. पण एक अंध व्यक्तिरेखा मात्र काहीच मागत नाही. लोकांच्या मागण्यांमध्ये देवाची तारांबळ उडते तेही विनोदी पद्धतीने दाखवण्यात आले आहे.