वर्ष सरता सरता

अमित घोडेकर,[email protected]

सरते वर्ष हायटेक होते… आणि येणारे वर्ष त्याहून हायटेक असणार आहे. या वर्षात लोकांना सर्वाधिक काय आवडले याची हायटेक माहिती…

२०१७ मध्ये टेक जगात बऱयाच घडामोडी घडल्या. सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे ४ जीने संपूर्ण हिंदुस्थान व्यापला. त्यामुळे अगदी गावखेडय़ापासून ते शहर…सगळीकडे लोकांच्या हातात इंटरनेटची जादूची छडी आली. ज्यामुळे कोणीही कुठेही कधीही मोबाईलवरून इंटरनेट वापरू लागले. ज्यांना इंटरनेट काय आहे हेदेखील कधी माहीत नव्हते त्यांच्यासाठीदेखील फेसबुक आणि व्हॉटस् ऍप दिनचर्येचा भाग झाला. यात गुगल हा सगळय़ांच्या आयुष्याचा महत्त्वाचा घटक झाला.

नुकताच गुगलने या वर्षात सर्वाधिक काय शोधले किंवा सर्च केले याची माहिती सादर केली. त्यात जवळपास सगळय़ाच सर्चमध्ये  ‘बाहुबली २’संदर्भात सगळय़ात जास्त माहिती शोधली गेली. ‘बाहुबली २’चा टीझरदेखील यू टय़ूबवर अवघ्या काही मिनिटांत लाखो लोकांनी पाहिला. त्यामुळे या वर्षी इंटरनेटवर ‘बाहुबली २’चं साम्राज्य होतं असंच म्हणावे लागेल. त्या खालोखाल या वर्षात आणखीन एक गोष्ट शोधली गेली ती म्हणजे आयपीएल. एकंदरीत आयपीएलचं गारुड अजूनही आपल्या डोक्यावर आहे हेदेखील सिद्ध झाले आणि त्यानंतर ‘लाइव्ह क्रिकेट स्कोअर’ हे गुगलचं नवीन सर्च, जिथून जगातील कुठल्याही क्रिकेट सामन्याचा त्या वेळचा स्कोर समजतो. त्यानंतर आमीर खानचा ‘दंगल’ आणि इतर काही चित्रपट गुगल सर्चच्या ‘टॉप १०’मध्ये आहेत.

एकंदरीत अपेक्षेप्रमाणे चित्रपट आणि क्रिकेट हे अजूनही आपल्या जीवनाचा कसा अविभाज्य भाग आहेत हे गुगलच्या सर्चवरूनच दिसून येते.  गुगलवरून याव्यतिरिक्तदेखील अनेक गोष्टी शोधल्या गेल्या. या वर्षात जीएसटी संदर्भातील अनेक प्रश्न लोकांनी सरकारऐवजी चक्क गुगललाच विचारले. एकंदरीत काय तर कुठेही काहीही अडलं की, करा सर्च  गुगलवर असंच काहीसं. नुकताच झालेला मिस वर्ल्ड निवडीचा कार्यक्रम आणि त्याचा व्हिडीओदेखील शोधला आणि पाहिला गेला. आधारकार्ड पॅनकार्डला कसं जोडायचं, जिओ फोन कसा बुक करायचा, म्युच्युअल फंडमध्ये कशी गुंतवणूक करायची अशा अनेक प्रश्नांची उत्तरेदेखील लोकांनी गुगलला विचारली. प्रत्येक वर्षी गुगलवर शोधल्या गेलेल्या बऱयाच गोष्टी बदलत राहिल्या. फक्त एकच गोष्ट गेल्या पाच वर्षांपासून अबाधित आहे ती म्हणजे सनी लिओनीची लोकप्रियता. अजूनही इंटरनेटवरील सर्वाधित लोकप्रिय व्यक्ती सनी लिओनीच आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच १ ते १५ जानेवारी २०१८  दरम्यान गुगलवर एक अनोखा उपक्रम राबवला जाणार आहे तो म्हणजे मराठी भाषा पंधरवडा. या पंधरा दिवसांत आपल्याला दुसऱया भाषेतील शब्द मराठीत भाषांतरित करायचे आहेत आणि भाषांतरित केलेला शब्द चूक आहे की बरोबर हे तपासायचे आहे. यासाठी गुगलने एक खास ऍपदेखील बनवले आहे जे तुम्ही गुगलवरून तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल करू शकता. जमा झालेल्या माहितीच्या आधारे गुगल त्यांच्या डेटाबेसमधील मायमराठीच्या अनेक शब्दांची योग्य साठवणूक करणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी व्हायला हवे व गुगल फक्त सर्चसाठी नाही, तर इतर चांगल्या गोष्टींची जोपासणूक करण्यासाठीदेखील करावा.