राज्यभरात हायऍलर्ट; रेल्वे स्थानके, एसटी स्थानके, संवेदनशील ठिकाणांवर कडक वॉच

सामना प्रतिनिधी । मुंबई

दोनच दिवसांपूर्वी रायगडात एका एसटी बसमध्ये जिवंत बॉम्ब सापडल्यानंतर गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांनी राज्यभरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. प्रत्येक संवेदनशील ठिकाणाची कसून तपासणी करण्यात येत आहे. मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणार्‍या लोकलला टार्गेट केल्यास मोठय़ा प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दहशतवाद्यांकडून या लाइफलाइनवरच हल्ला होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानके, एसटी स्थानके तसेच मुंबईसह राज्यभरातील सर्व संवेदनशील ठिकाणांवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुंबईत तब्बल 5 हजार सीसीटीव्हींचा वॉच असेल. गस्ती वाहने तयार ठेवण्यात आली आहेत.

रेल्वे पोलीस आणि आरपीएफच्या जवानांना प्रत्येक प्रवाशावर बारीक नजर ठेवण्यास सांगण्यास आले आहे. रेल्वे स्थानकाचा कोपरान् कोपरा पिंजून काढण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानकातील सीसीटीव्ही आणि साध्या वेशातील पोलिसांना 24 तास डय़ुटीवर तैनात ठेवण्यात आले आहे.

रेल्वे ट्रकवरही राहणार कडक वॉच

गेल्या वर्षी दिवा स्थानकात लोखंडी रॉड ठेवण्यात आले होते. अशाप्रकारे एखादी जड वस्तू ठेवूनही घातपात घडवला जाऊ शकतो. लांबपल्ल्याच्या गाड्यांमधील लाखो प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे रेल्वे ट्रकवरही कडक वॉच ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सोशल मीडियाही स्कॅनरखाली

सोशल मीडियावरही पोलीस यंत्रणांचा कडक वॉच राहणार आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या जाऊ नयेत. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ नये  किंवा अफवा पसरू नयेत यासाठी येथील प्रत्येक हालचालीवर पोलिसांची बारीक नजर राहणार आहे.

रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांच्या दक्ष राहण्याच्या सूचना

कुठलीही संशयास्पद हालचाल आढळली आणि तशी माहिती पोलीस यंत्रणांना मिळाली की तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. दोन्ही यंत्रणांची श्वान पथकेही सर्व रेल्वे स्थानकांवर तैनात ठेवण्यात आली आहेत. लांबपल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसमध्ये कसून शोधमोहीम राबवण्यात येणार आहे. तशा सूचनाच रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलांना दिल्या आहेत.

एटीएसने पसरवले खबर्‍यांचे जाळे

दहशतवादविरोधी पथकाने मुंबईसह राज्यभरात खबर्‍यांचे जाळे पसरवले आहे. या खबर्‍यांना प्रत्येक क्षण ऍलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपापल्या भागात प्रत्येक संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचनाही पोलिसांनी दिल्या आहेत.

पुलवामाच्या घटनेनंतर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकांवर हाय ऍलर्ट ठेवण्यात आला आहे. – अश्रफ के. के. (मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त)