ज्ञानाचा खजिना


रतिंद्र नाईक

न्यायालयातील ग्रंथालये… कायदेविषयक पुस्तके वगळता ही ग्रंथालये ज्ञानाचा आणि संस्कृतीचा खजिना आहेत.

समाजात अन्यायाविरोधात दाद मिळविण्यासाठी प्रत्येकजण न्यायालयाचे दार ठोठावतो. याच न्यायालयात न्यायदानाचे मोलाचे कार्य चालते. न्याय देणाऱया या संस्थेत केवळ न्यायच नाही तर न्यायालयीन माहितीचा खजिनाही दडला आहे. या माहितीच्या आधारेच आजवर प्रत्येकाला समान न्याय मिळत आला आहे. चला तर न्याय संस्थेतील अमर्याद शाब्दिक भांडाराची माहिती घेऊया.

 स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या हिंदुस्थानातील न्यायालयांपैकी मुंबई उच्च न्यायालय हे एक महत्त्वाचे न्यायालय मानले जाते. मुंबईतल्या फोर्ट येथे १८ व्या शतकात ब्रिटिशांनी उभारलेले हे न्यायालय आजही खंबीरपणे उभे आहे. सुरुवातीस केवळ चार न्यायाधीशांसाठी बांधण्यात आलेल्या या न्यायालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आदी महापुरुषांची कारकीर्द उलटून गेली आहे.

न्यायदानाचे कार्य चालणाऱया मुंबई उच्च न्यायालयात पुस्तकांचा खजिनाच दडला आहे. उच्च न्यायालयात तीन ग्रंथालये अस्तित्वात असून दोन लाखांहून अधिक पुस्तकांचा संग्रह या ग्रंथालयांमध्ये आढळून येतो. १८६२ म्हणजेच हायकोर्टाच्या स्थापनेपासून येथील ग्रंथालये सुरू करण्यात आली आहेत. हायकोर्ट लॉ लायब्ररी, कीर्तिकर लायब्ररी आणि जजेस लायब्ररी अशी या ग्रंथालयांची विभागणी करण्यात आली आहे. दगडी बांधकाम असलेल्या मुंबई हायकोर्टाच्या तळमजल्यावर न्यायमूर्तींचे ग्रंथालय (जजेस लायब्ररी) आहे. तर हायकोर्ट लॉ लायब्ररी आणि कीर्तिकर लायब्ररी ही उच्च न्यायालयाच्या पहिल्या मजल्यावर आढळून येते.

court-library

मुंबई हायकोर्ट लॉ लायब्ररी…मुंबई उच्च न्यायालयातील तीनही ग्रंथालयांपैकी सर्वात मोठी मुंबई हायकोर्ट लॉ लायब्ररी आहे. दुमजली असणाऱया ग्रंथालयाच्या या वास्तूत दोन लाखांहून अधिक पुस्तकांचा साठा असून वाचकास ती सहज मिळतील अशा मांडणीत ती ठेवण्यात आली आहेत. सुमारे ५०० वकील सहज या ग्रंथालयात बसून पुस्तके चाळू शकतील एवढी प्रशस्त जागा या ग्रंथालयाची आहे. दगडी बांधकामासोबतच लाकडी बांधकामांवरील पुरातन वास्तू शैली ग्रंथालयाला भेट देणाऱया प्रत्येकाच्याच डोळय़ात भरते. केवळ वकील आणि कोर्टातील कर्मचाऱयांसाठी येथील ग्रंथालयाची मेंबरशिप देण्यात येते. वकिलांची जेवढी सनद जुनी तेवढे दर वर्षाकाठी आकारले जातात. पुस्तके ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली लाकडी कपाटेही या ग्रंथालयात आपला वेगळा ठसा उमटवतात. एवढेच नव्हे तर नानी पालखी, नौरोज शिरवाई, आमिन, दफ्तरी आदी नामांकित वकिलांची भली मोठी पोर्ट्रेटही या ग्रंथालयात लावण्यात आली आहे. अशी माहिती ग्रंथालयाचे असिस्टंट लायब्रेरियन आर. एस. पवार यांनी दिली.

कीर्तिकर लायब्ररी…मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या मजल्यावर कीर्तिकर लायब्ररी आहे. पूर्वी वेस्टर्न इंडिया ऍडव्होकेट असोसिएशन या नावाने ओळखल्या जाणाऱया या लायब्ररीत वकिलांचा नेहमीच राबता असतो. या लायब्ररीत कमी प्रमाणात पुस्तके असली तरी वकिलांना बसण्यासाठी येथे प्रशस्त जागा आहे. केवळ वकिलांसाठीच या ग्रंथालयाची मेंबरशिप देण्यात येते.

न्यायमूर्तींचे ग्रंथालय (जजेस लायब्ररी)…हायकोर्टाच्या तळमजल्यावरच जजेस लायब्ररी असून एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसप्रमाणेच या ग्रंथालयाची रचना आह. केवळ न्यायमूर्तींसाठीच या ग्रंथालयाची मेंबरशिप देण्यात येते. या लायब्ररीतही न्याय व्यवस्थेशी संबंधित असंख्य पुस्तके आढळून येतात. लायब्ररीत वाचनाकरिता  वेगळी केबिन आहे. पुस्तके ठेवण्याकरिता पोटमाळा तयार करण्यात आला आहे. येथील लाकडी फर्निचर तसेच रंगसंगतीमुळे ही लायब्ररी अधिक उठावदार दिसते. हायकोर्ट लॉ लायब्ररी आणि कीर्तिकर लायब्ररीपेक्षा जजेस लायब्ररी आपले वेगळेपण टिकवून आहे.