मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हणावेच लागणार!: उच्च न्यायालय

सामना ऑनलाईन । अलाहाबाद

मदरशांमध्ये मुलांना राष्ट्रगीत म्हणावेच लागणार, असा स्पष्ट निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हणावे लागणार असा निर्णय घेतला होता. योगी सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र न्यालायाने ही याचिका धुडकावून लावत राष्ट्रगीत म्हणण्यापासून मदरशांना सूट मिळणार नाही असे सांगितले.

राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज यांचा सन्मान केलाच पाहिजे. ते प्रत्येकाचे कर्तव्य आहे. राष्ट्रगीत देशातील नागरिकांमध्ये भेदभाव करत नाही, ते सगळ्यांसाठी आहे आणि सगळेच म्हणू शकतात. त्यामुळे मदरशांतील मुलांना राष्ट्रगीत म्हणावेच लागेल असे न्यायालयाने सांगितले.

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच १५ ऑगस्टला उत्तर प्रदेश सरकारने मदरशांमध्ये ध्वजारोहणाचे आणि देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. अनेक मुस्लिम संघटनांनी योगी सरकारचा विरोध करताना मुस्लिमांच्या देशभक्तीवर शंका उपस्थित केली जात असल्याचा आरोप केला होता.