छगन भुजबळ यांना हायकोर्टाचा दिलासा

सामना ऑनलाईन । मुंबई

न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय महाराष्ट्रासह देशभरात कुठेही फिरण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र न्यायालयाने ही मुभा देतानाच भुजबळ यांना त्यांच्या महाराष्ट्राबाहेरील वास्तव्याची माहिती पोलिसांना आगाऊ देणे बंधनकारक केले आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली होती. जामीन देतेवेळी न्यायालयाने भुजबळ यांना मुंबईबाहेर  जाण्यापूर्वी न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक केले होते. आमदार असल्याने आपणास राजकीय तसेच सामाजिक कार्यासाठी मुंबईबाहेर जावे लागते. शिवाय आपण महात्मा फुले समता परिषदेच्या सदस्यपदी असल्याने आपणास राज्याबाहेर जावे लागत असल्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात फिरण्याची मुभा द्यावी अशी विनंती करणारी याचिका भुजबळ यांनी हायकोर्टात दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने भुजबळ यांचा विनंती अर्ज स्वीकारत त्यांना कोर्टाच्या परवानगीशिवाय देशात फिरण्याची मुभा दिली.