दाभोलकर-पानसरे कुटुंबीयांना उच्च न्यायालयानं झापलं, वाचा काय आहे कारण

dabholkar-and-pansare-photo

सामना ऑनलाईन । मुंबई

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांसह दाभोलकर आणि पानसरे कुटुंबीयांना झापलं आहे. या प्रकरणासंदर्भात वारंवार मीडियासमोर जाऊन बोलणं योग्य नसल्याचं उच्च न्यायलयानं म्हटलं आहे.

नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा अहवाल आज उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. यावेळी पानसरे यांच्या हत्येप्रकरणी इतर तपास यंत्रणांवर अवलंबून राहू नका असं उच्च न्यायालयाने एसआयटीला खडसावलं आहे. तसेच सीबीआयच्या अतीउत्साहीपणामुळे गुप्त माहिती प्रसिद्धी माध्यमासमोर येते. अशाप्रकारे माहिती बाहेर आल्याने इतर आरोपी सतर्क होतात, असं न्यायालयाने यावेळी म्हटलं आहे.

पकडलेले आरोपी सुटले तर त्यांच्या आयुष्याचं किंवा त्यांच्या कुटुंबीयांचं काय? असा प्रश्न उपस्थित करत या यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. तपास यंत्रणांचं लक्ष विचलित करण्याची ही चाल देखील असू शकते, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.