झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने अख्खा रस्ताच चोरला

सामना ऑनलाईन । बीजिंग

चिन्यांच्या अजब देशामध्ये एका चोराने श्रीमंत होण्यासाठी अख्खा रस्ताच चोरल्याचे समोर आले आहे. चीनमधील जिआंन्सू प्रांतामधील सानकेशू गावातील लोकं सकाळी जागे झाले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला कारण त्यांच्यासमोरील तब्बल ८०० मीटरचा रस्ता गायब झाला होता. त्या जागेवर फक्त माती आणि खडी शिल्लक राहिली होती. ग्रामस्थांना आधी वाटले की रस्त्याचे काम करायचे असल्याने खोदकाम करण्यात आले आहे, मात्र पोलिसांनी याप्रकरणातील सत्य सांगितले तेव्हा त्यांना दिवसा तारे दिसू लागले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमेंट-काँक्रिटपासून बनलेला हा रस्ता चोराने एका रात्रीत गायब केला. झु नावाच्या या चोराने मशिनच्या मदतीने रस्त्याचे खोदकाम केले आणि एका सिमेंटच्या कारखान्याची त्याची विक्री केली. या व्यवहारात चोराला तब्बल ५१ हजार रुपये मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अटक केल्यानंतर झु याने आपण कोणतेही चुकीचे काम केले नाही असे म्हटले आहे. कारण जो रस्ता चोरी करण्यात आला होता त्याचा गाववाले कधी वापरच करत नव्हते आणि त्यामुळे झटपट श्रीमंत होण्यासाठी आपण ही चोरी केल्याचे झु म्हणाला.