हिमाचल प्रदेशमध्ये झाले ७४ टक्के मतदान

सामना ऑनलाईन । सिमला

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या ६८ जागांसाठी ७४ टक्के मतदान झाले. काही मतदान केंद्रांमध्ये नेमके किती मतदान झाले हे उशिरा कळणार असल्यामुळे शुक्रवारी सकाळी अचूक आकडेवारी सांगणे शक्य होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. याआधी २०१४ मध्ये लोकसभेसाठी ६४.४५ तर २०१२ मध्ये विधानसभेसाठी ७३.५१ टक्के मतदान झाले होते.

निवडणूक शांततेत पार पडली, कुठेही हिंसक घटनेची नोंद झालेली नाही, असे निवडणूक आयोगाने सांगितले. पेड न्यूज प्रकरणी ९० नोटीसा पाठवल्या आहेत. काही ठिकाणी तांत्रिक कारणामुळे मतदानाची प्रक्रिया उशिरा सुरू झाली, त्यामुळे तिथल्या मतदानाचे आकडे उशिरापर्यंत कळतील, असे निवडणूक आयोगाने सांगितले.

मतमोजणी १८ डिसेंबर रोजी होणार आहे, त्याचदिवशी ३३७ उमेदवारांचे भवितव्य स्पष्ट होणार आहे.

पहिला मतदार

स्वतंत्र हिंदुस्थानचे पहिले मतदार श्याम शरण नेगी यांनी वयाच्या शंभरीतही मतदान केले. निवडणूक आयोगाने लाल गालिचा अंथरुन त्यांचे शानदार स्वागत केले. नेगी यांनी नागरिकांना ‘मतदानाचा हक्क बजावण्याची संधी सोडू नका, देशहितासाठी मतदान करा’ असे आवाहन केले.