इतिहासाचे विकृतीकरण रोखण्यासाठी कायदा करा! – हिंदु जनजागृती समिती

सामना ऑनलाईन । मुंबई

केंद्र सरकारने इतिहासाचे विकृतीकरण रोखणारा कायदा करून आपली संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांचे जतन करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. अन्यथा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणीही आपल्या श्रद्धास्थानांना नाचवतांना दाखवेल. इतिहासाचे विकृतीकरण हिंदु समाज खपवून घेणार नाही. देशात हिंदुत्ववादी विचारांचे शासन असतांना हिंदुंना अशाप्रकारे लढा द्यावा लागणे लज्जास्पद आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे म्हणाले.

पद्मावतीत बदल करण्याच्या सेन्सॉरच्या सूचना, नावातही होणार बदल

‘केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने (CBFC) ‘पद्मावती” या चित्रपटाला २६ कट आणि चित्रपटाचे नाव बदलल्यास चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याची दर्शवलेली तयारी, ही हिंदू संघटनांच्या तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार आहे’, असे शिंदे म्हणाले.

‘चित्रपटाविषयी वाद काय आहे आणि त्यावर उपाययोजना काय काढली जात आहे? या चित्रपटातील कथानकांची म्हणजेच राणी पद्मावती, राजा रतनसिंह, अल्लाउद्दीन खिलजी यांच्यासह चित्तोडगड आणि चित्रपटातील घटनांचा काळ या सर्व ऐतिहासिक गोष्टी त्याच रहाणार आणि केवळ हा चित्रपट काल्पनिक आहे असा डिस्क्लेमर घालून चित्रपट काल्पनिक ठरवणार, ही चित्रपटाला प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काढलेली पळवाटच आहे. समाज चार ओळींचे डिस्क्लेमर लक्षात ठेवेल की चित्रपटाचे दृकश्राव्य कथानक आणि प्रसंग लक्षात ठेवेल. त्यामुळे अशा प्रकारे डिस्क्लेमर घालून आणि चित्रपटाचे नाव बदलून नाही, तर त्यातील इतिहासाचे विकृतीकरण करणारे आक्षेपार्ह प्रसंग वगळूनच तो सेन्सॉर व्हायला हवा. घूमर या गाण्यात राजकुलीन राणी पद्मावतीला नाचतांना दाखवण्यासारखे आक्षेपार्ह प्रसंग वगळा; अन्यथा हिंदूंच्या रोषाला सामोरे जा, असा इशारा हिंदु जनजागृती समितीने दिला आहे.